अंबाजोगाईत रेल्वे तर सोडा…’घाटनांदूर’ ला थांबाही मिळेना…लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष…!

टीम AM : अंबाजोगाई शहराला चळवळीचा फार मोठा इतिहास आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या चळवळीचे बीजं इथूनच रोवली गेली. परंतू, गेल्या काही वर्षांत येथीळ चळवळीची हानी तर झालीच आहे, त्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधींची उदासिनता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या ‌कित्येक वर्षांपासून अंबाजोगाईकर रेल्वेच्या मागणीसाठी संघर्ष करीत आहेत. परंतू रेल्वे काही ‌अंबाजोगाईला आली नाही. रेल्वे तर सोडाच तालुक्यातील ‘घाटनांदूर’ ‌येथील रेल्वेस्थानकांवर ‌साधा थांबाही लोकप्रतिनिधींना मिळवता आला नाही, ही नक्कीच ‌दुर्दैवाची बाब आहे. 

अंबाजोगाई शहर व तालुक्यातील शेकडो नागरिक विविध कामानिमित्त नियमितपणे हैदराबादला प्रवास करतात. काम आटोपल्यानंतर सिकंदराबादहून सकाळी व सायंकाळी सुटणाऱ्या ‘एक्सप्रेस’ रेल्वेने ते परतीचा प्रवास करतात. मात्र, या रेल्वेला मार्गातील अनेक स्थानकांवर थांबा असताना ‘घाटनांदूर’ स्थानकावर थांबा नाही. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील नागरिकांना इतर स्थानकांवर उतरून अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना ‌आर्थिक भुर्दंड ‌तर बसतोच शिवाय वेळही खर्चिक होतो. याशिवाय या मार्गावरील अन्य काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांनाही ‘घाटनांदूर’ येथे थांबा नसल्याची माहिती समोर आली आहे. 

लोकप्रतिनिधींची भूमिका पुन्हा चर्चेत

दरम्यान, अंबाजोगाईतील रेल्वे प्रश्नावर लोकप्रतिनिधींची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. नागरिकांच्या मागण्यांवर निवेदनं देण्यापलीकडे ठोस पाठपुरावा होत नसल्याची भावना व्यक्त होत असून, केवळ निवेदनं देऊन जबाबदारी संपत नाही, अशी प्रतिक्रिया अंबाजोगाईकरांकडून व्यक्त केली जात आहे. ‘घाटनांदूर’ रेल्वे स्थानकावर ‘एक्सप्रेस’ रेल्वेचा थांबा मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत अंबाजोगाई आणि ‘घाटनांदूर’ च्या ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ‘घाटनांदूर’ स्थानकाच्या थांब्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here