जंतर – मंतरवरील लाठीमाराच्या निषेधार्थ अंबाजोगाई बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद : घाटनांदूरमध्येही कडकडीत बंद…!

टीम AM : दिल्लीतील जंतर – मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या 23 जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ च्या हाकेला अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच घाटनांदूर येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला.

सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई शहरातून मोटरसायकल रॅली काढून व्यापारी व नागरिकांना बंदचे आवाहन केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली.

बंदला प्रतिसाद देत अंबाजोगाईतील बहुतांश शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद ठेवण्यात आल्या. व्यापारी बांधवांनीही विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा – सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. संपूर्ण बंद शांततेत पार पडल्याचे चित्र अंबाजोगाई आणि घाटनांदूर येथे पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here