अंबाजोगाई तालुक्यात पावसाचा तडाखा : गहू पिकांचे मोठे नुकसान, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील पूस परिसरात आज दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे शेतातील गहू पूर्णपणे आडवे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पिके चिखलात झोपल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या गहू पीक काढणीपूर्व अवस्थेत असल्याने या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होणार आहे.

पावसामुळे शेतात पाणी साचल्याने तसेच वाऱ्याच्या तडाख्यामुळे दाण्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली असून प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here