अंबाजोगाई : देशाच्या भविष्याकडे दिर्घ पल्याच्या विकासाची दृष्टीने पाहणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचे विचार जपण्यासाठी अशा समारोहाची गरज आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक तथा जागतिक भाषांचे अभ्यासक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.
येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनीय भाषणात पद्मश्री डॉ. गणेश देवी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी “दिव्य मराठी” चे संपादक संजय आवटे होते. यावेळी व्यासपीठावर समारोह समितीचे सचीव दगडु लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात डॉ. गणेश देवी यांनी आजच्या काळात यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती, त्यांचे विचार जपून ठेवणे हे खुप महत्त्वाचे काम आहे असे सांगत या स्मृती जपून ठेवण्याची सुरुवात भगवानराव लोमटे यांनी ३५ वर्षापुर्वी मित्र प्रेमातुन केलेली असली तरी आज या स्मृतीला फार वेगळे महत्व आणि संदर्भ जोडल्या गेले आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या उभारणीच्या काळात अनेक संस्था निर्माण केल्या, समाज जोडण्याचे काम केले. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा (इंन्स्टिट्युट) पाया भक्कम करुन या संस्थांना महत्त्व प्राप्त करुन दिले आणि पुढे या संस्था राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीचा भक्कम आधार बनल्या. भविष्याकडे दिर्घ पल्याची दृष्टी टाकणारा, कला- संगीत आणि संस्कृतीची योग्य सांगड घालणा-या नेत्यांपैकी एक प्रमुख नेते म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पहावे लागेल, असे मत डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करतांना संजय आवटे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला. साहित्य-कला-संस्कृती यांचे महत्त्व जोपर्यंत समजावून घेता येत नाहीत तो पर्यंत राजकीय निर्णय घेण्याची परीपक्वता येत नाही असे सांगत यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या अनेक विचारांचे संदर्भ आणि आजच्या राजकीय परिस्थितीशी सांगड घालत सांगितले. यशवंतरावांनी फार वर्षापुर्वी “राजकारण घाणेरडे आहे असे म्हणण्यास सुरुवात झाली की अराजकता करणा-यांचे फावते” असे म्हटले होते. त्याचाच प्रत्यय आजच्या राजकारणात येतो आहे. तेंव्हा या राज्यावर कोणाचेच सरकार कायम नसते, लोक येतात आणि जातात मात्र या राज्यात या देशात कायम तुमची आणि आमची कायम सत्ता असते, या देशात सार्वभौम सत्ता आहे याचे भान सर्वसामान्य लोकांना असायला हवे असे मत संजय आवटे यांनी व्यक्त केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडु लोमटे यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सतीष लोमटे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांचा आणि उदघाटक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांचा परीचय प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मेघराज पवळे यांनी मानले.
उदघाटन समारंभानंतर नांदेड येथील स्वा.रा. ती. मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा सुप्रसिध्द कवी डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील रंगदार कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनाचे सुत्रसंचालन अकोल्याचे सुप्रसिद्ध कवी अनंत खेळकर यांनी केले तर या कवी संमेलनात अमरावतीचे नितीन देशमुख, पलुसचे रमजान मुल्ला, पनवेलच्या ज्योत्सना राजपूत, रायगडचे बंडु सुमन अंधेरे, नाशिकचे प्रशांत केंदळे, उस्मानाबादच्या भाग्यश्री केसकर आणि धुळ्याचे प्रा. सदाशीव सुर्यवंशी यांनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परीसरातील रसिक श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.