अंबाजोगाई : यशस्वी जीवनासाठी तरुणांनी शिक्षणासमवेत आजच्या सेवा क्षेत्राला आवश्यक अशा कौशल्याला शिकून घेण्याची, कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी ठेवली तरच यशाला गवसणी घालता येते असे प्रतिपादन अंबानगरीचे भूमिपुत्र, जळगाव येथील जैन इरिगेशन समुहातील मुख्य समन्वयक विनोद रापतवार यांनी केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात माजी प्राचार्य स्व.भ.कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख उदघाटक म्हणून विनोद रापतवार बोलत होते.
स्व. भ.कि. सबनीस सरांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंगी एक धाडस पेरले. शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना नैतिक अधिष्ठान कसे साध्य केले जाईल यावर त्यांचा भर होता. नामांतर चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ या सारख्या चळवळीत सबनीस सरांनी सक्रीय असे कार्य केले होते. अनेक यशस्वी विद्यार्थी त्यांनी घडवले होते. तरुणांनी स्वतःला ओळखले पाहिजे मोबाइलच्या मोहजालातून तरुणांनी बाहेर पडून रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. आज विचार करण्याची प्रवृत्ती बंद होत आहे. एक प्रकारे भांबावलेली अवस्था तरुणाची झालेली आहे. यातून बाहेर पडून तरुणांनी अभिव्यक्त झाले पाहिजे. नौकरीच्या संधी अत्यल्प असल्यामुळे कृषी व्यवसायाकडे लक्ष देवून चांगली शेती केली तर प्रचंड उत्पन्न घेता येते व चांगली आर्थिक प्राप्ती होते. तरुणांनी या बाबी समजून घेवून आपला मार्ग निश्चित करावा असे आवाहन विनोद रापतवार यांनी केले.
उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केला. अभ्यासू जाणकार वक्ते निर्माण व्हावेत या हेतूने हि स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांनी विषय समजून घेतला पाहिजे व अभ्यास करून मांडणी केली पाहिजे. आजचा तरून वर्ग विधायक कामाकडे वळला पाहिजे असे प्रतिपादन डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केले. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी प्रास्ताविक केले. कृतीशील, चळवळीला महत्व देणारे, प्रागतिक विचारांचे विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न स्व. प्राचार्य भ.कि. सबनीस यांनी केला होता असे प्रतिपादन प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी केले.
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या संयोजिका, राज्यशास्त्र विभागाच्या डॉ.शैलजा बरुरे यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. राज्यशास्त्र विभागाने पंधरा वर्ष सातत्याने हि स्पर्धा आयोजित केली असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धनाजी आर्य यांनी केले. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून स्पर्धक विद्यार्थी आले होते.