गैरव्यवहार दडवण्याच्या उद्देशाने रेकॉर्ड नष्ट केल्या प्रकरणी झाली कारवाई
अंबाजोगाई : स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या आजी-माजी संचालकांसह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, अपहार दडवण्याच्या उद्देशाने संस्थेचे रेकॉर्ड नष्ट केल्या प्रकरणी ४७ जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था अंबाजोगाई / परळी कायमच चर्चेत राहिली आहे. या पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार, अपहार असे अनेक मुद्यांवर संचालक मंडळाने उपोषण देखील केले होते, मात्र त्यावर तोडगा काही निघाला नाही. या पतसंस्थेच्या आजी-माजी संचालक मंडळाने सन 2000 ते 2012 पर्यंतच्या कालावधीत संस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार, अपहार दडवण्याच्या उद्देशाने संस्थेचे रेकॉर्ड हेतुपूरस्पर नष्ट केलेलं आहे. लेखा परीक्षण विभागाने पतसंस्थेचे लेखा परीक्षण करण्यासाठी वारंवार रेकॉर्ड मागितले. मात्र रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले नाही. रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी उपजिल्हानिबंधक कार्यालया समोर जानेवारी 2017 ला 9 नवीन संचालक मंडळाने दि. 18/12/18 पासून उपोषणाला बसले होते. या उपोषणाची दखल घेऊन बीड जिल्ह्याच्या विशेष लेखा परीक्षकांनी चार दिवसानी उपोषण सोडले होते. तरी मात्र रेकॉर्ड काही उपलब्ध करून देण्यात आले नाही.
वारंवार मागणी करून देखील रेकॉर्ड मिळत नसल्याने संचालक ,कर्मचारी सहकार्य करत नाहीत पाहून शेवटी बीडचे जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब फासे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात ४७ आजी – माजी संचालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध कलम १७५,३४ भादवी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे करीत आहेत.