विधानसभा निवडणुकांची घोषणा ; महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान

राज्यात आजपासून आचारसंहिता झाली लागू

नवी दिल्ली : विधानसभा निवडणूकीची प्रतिक्षा संपली असुन महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर आज झाली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच, दिवाळीपूर्वीच जाहीर होणार आहे. दरम्यान आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८.९४ कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा आहे

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी