गणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण
अंबाजोगाई : नगर परिषदेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त वर्ष- 2019 घेण्यात आलेल्या प्रबोधनपर ‘आरास देखावा व मिरवणूक आरास देखावा’ स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना सोमवार,दि.16 सप्टेंबर 2019 रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात पारितोषिक वितरण करून प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा रचनाताई मोदी यांनी पालिकेच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते असे सांगितले. लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी गणेशोत्सव सुरू केला. शहरातील गणेश मंडळांचा सामाजिक उपक्रमाचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे नगराध्यक्षा मोदी म्हणाल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे यांनी अंबाजोगाईतील गणेशोत्सव व शिवजयंती जन्मोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत असल्याबद्दल सांगुन विजेत्या संघाचे अभिनंदन केले. नगरपरीषदेच्या सभापती वासंतीताई बाबजे यांनी ‘एक गल्ली,एक गणपती’ ही संकल्पना पुर्णत्वास यावी असे सांगुन प्लास्टीक निर्मुलन व वृक्षारोपण संवर्धनासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. परिक्षकांच्या वतीने बोलताना पत्रकार शिवकुमार निर्मळे यांनी स्पर्धा ही खिलाडू वृत्तीची असावी, पराभव पचवायला शिकलं पाहिजे, नव्या पिढीने समजूतदारपणा अंगीकारावा,योग्य निकषांनुसारच परिक्षण केले असल्याचे सांगुन महिला लोकप्रतिनिधीं मार्फत पारितोषिक वितरण होत असल्याबद्दल पत्रकार निर्मळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गणेशोत्सव-2019 आरास स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- 1)राजस्थानी गणेश मंडळ (प्रथम), पारितोषिकाचे स्वरूप- 5 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह, 2) नवयुवक गणेश मंडळ, मंगळवार पेठ (द्वितीय), पारितोषिकाचे स्वरूप- 3 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह, 3) महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळ,देशपांडे गल्ली (तृतिय), पारितोषिकाचे स्वरूप- 2 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह,4) ज्योती गणेश मंडळ (उत्तेजनार्थ)
मिरवणुक स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे 1) हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ,खडकपुरा (प्रथम),पारितोषिकाचे स्वरूप-5 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह, 2) नवयुवक गणेश मंडळ,मंगळवारपेठ (द्वितीय),पारितोषिकाचे स्वरूप-3 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह, 3) जयमल्हार गणेश मंडळ,धनगर गल्ली (तृतिय) पारितोषिकाचे स्वरूप-2 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह तर व्यंकटेश गणेश मंडळ,मंडीबाजार (उत्तेजनार्थ) पारितोषिकाचे स्वरूप-सन्मानचिन्ह,हे विजेते ठरले.पूरग्रस्तांना मदत करून गणेश उत्सवासाठी संकलीत केलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिल्याबद्दल ‘प्रशांतनगर गणेश मंडळ’ व ढोल पथकाच्या माध्यमातून पारंपारिक रितीने उत्सव साजरा केल्याबद्दल ‘प्रशांतनगरचा राजा’ या गणेश मंडळास प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात आले. प्रारंभी दिपप्रज्ज्वलन करून लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.सुत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार जगदीश जाजू यांनी मानले.या कार्यक्रमास विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी,नागरीक व पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.