उर्दू शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घेणार – राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाईत उर्दू परिषदेचे आयोजन ; पाच तालुक्यांचा सहभाग

अंबाजोगाई : मराठी माध्यमातील शाळांच्या धर्तीवर उर्दू शाळांमधील गुणवत्ता वाढीस लागावी, तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता जिल्हा परिषदांच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले. ते अंबाजोगाईत उर्दू परिषदेचे उद्घाटक म्हणुन बोलत होते.

अंबाजोगाईतील मिल्लीया प्राथमिक शाळा, सदर बाजार येथे उर्दू परिषदेचे आयोजन बुधवार,दि.18 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्दू समन्वय समितीचे सदस्य सलिम जहाँगीर (बीड) हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय काळे, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड सर्व शिक्षा अभियानचे आसाराम काशिद, अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत, केजचे गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, माजलगांव येथील बेडसकर, परळी येथील शिक्षण विस्तार अधिकारी काळे मॅडम, अंबाजोगाई येथील शिक्षण विस्तार अधिकारी पठाण मॅडम, अकबर जहाँगीर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

उर्दू परिषदेत पाच तालुक्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व संशोधक उपस्थित होते. यावेळी उद्घाटक म्हणुन बोलताना राजेसाहेब देशमुख यांनी बीड जिल्हा परिषदेने गुणवत्ता व भौतिक विकास याच्या बाबतीत महाराष्ट्रात आग्रक्रम घेतला असल्याचे सांगुन बीड जिल्हा परिषदांच्या शाळा या पहिल्या पाच मध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. याच पद्धतीने उर्दू शाळांचा विकास व्हावा, लोकसहभाग वाढवा, शाळांमधील भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात,गुणवत्ता वाढीस लागून,उर्दू शाळांची सुधारणा व्हावी, उर्दू शाळा डिजीटल व्हाव्यात या बाबतीत आजच्या परिषेद चर्चा होणार आहे. गुणवत्ता वाढल्याने विद्यार्थ्यांचा कल सध्या जिल्हा परिषद शाळांकडे वाढला आहे. त्या प्रमाणे पुढील काळात उर्दू माध्यमांच्या शाळांमधुन दर्जेदार शिक्षण मिळावे, भौतिक सुविधा दिल्या जाव्यात या करिता शिक्षकांनी समर्पित भावनेने विद्यादानाचे कार्य करावे असे आवाहन राजेसाहेब देशमुख यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना सलिम जहाँगीर यांनी उर्दू परिषदेच्या माध्यमातून होत असलेले विचारमंथन हे मौलिक असल्याचे प्रतिपादन केले. या परिषदेमधून भविष्यात उर्दू माध्यमांच्या शाळा अद्ययावत होवून दर्जेदार उर्दू माध्यमातून शिकण्याची सुविधा निर्माण होणार असल्याचे सलिम जहाँगीर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख इसाक यांनी तर सुत्रसंचालन रंगनाथ राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार आसाराम काशिद यांनी मानले.