आ. संगिता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ
केज : केज विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार संगिता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन केज पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याने विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आ. ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी प्रकरण कथीत संचालक गणपती कांबळे यांनी ठोंबरे पती, पत्नीने आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.
लाडेगाव येथील गणपती सैनाप्पा उर्फ सोनाप्पा कांबळे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणीचे संचालक आहेत. त्यांनी सुतगिरणीच्या झालेल्या आर्थिक व्यवहारात संचालक म्हणून घेतलेली स्वाक्षरी ही आपण केली नसून सुतगिरणीचे चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे व आमदार संगीता ठोंबरे यांनीच आपली बनावट सही केली आहे. सदर झालेल्या आर्थिक व्यवहारात आपला कसल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा आश्विनी पवार या फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडून हे प्रकरण केजच्या न्यायालयात दाखल केले होते.
सदर प्रकरणी चौकशी करून आमदार संगीता ठोंबरे, चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरुद्ध बनावट दस्तऐवज तयार करून ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत अशी मागणी कांबळे यांनी केली होती. केजच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीषा थोरात यांनी ठोंबरे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या नंतर मंगळवारी या प्रकरणी आमदार संगिता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले यांनी याला दुजोरा दिला. आमदार ठोंबरे यांनी सुरुवातीलाच हा प्रकार आपल्या विरोधातील षडयंत्र असल्याचे सांगितले होते.