आर्थिक मंदी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवीले पाहीजे – माजी खा. राजू शेट्टी

अंबाजोगाई : शासनाकडून शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवीले जात असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. ती रोखण्यासाठी शेती मालाला योग्य भाव व शेतकर्‍यांच्या हिताचे धोरण राबवीने गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी केले.

तालुक्यातील आपेगाव येथे मंगळवारी ( दि. १७) आयोजीत करण्यात आलेल्या दुष्काळ मुक्तीच्या महामेळ्याव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा येथील सरपंच बाळासाहेब देशमुख होते. मंचावर सत्तार शेख, जयजित शिंदे, अरूण कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, रसीका ढगे, प्रा. डॉ. प्रकाश पोकळे, अॅड. विजय जाधव, गणेश मांझे, रावसाहेब अंबानी, किशोर ढगे, किशन कदम, अनील पवार, योगेश शेळके, तालमणी उध्दवबापू आपेगावकर, ॲड. संतोष पवार होते.

पुढे बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, परदेशातून मोठ्या प्रमाणात जिवनावश्यक वस्तू आयात कराव्या लागत असल्याने देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. या कारणामुळे पैशाचे मुल्यांकन ढासळले असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून कंपन्याचे मालक जगवीण्याचे धोरण सरकार राबवत असल्याने त्यांच्यापेक्षा रझाकार बरे होते असे म्हणण्याचे वेळ आली असल्याची टिका शेट्टी यांनी केली. प्रास्ताविक करतांना आपेगाव येथील शेतकरी जयजित शिंदे म्हणाले की, आपेगाव येथील शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही म्हणून शासन- प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर २५ किमी पायी चालण्याचा मोर्चा काढण्याची वेळ आली होती. या भागात गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर असून गुरे जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महिला, मोठ्यासंख्येने उपस्थित होते.