अंबाजोगाई : माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांच्या स्नुषा नमिता अक्षय मुंदडा यांनी नुकतीच पॅरीस येथील ‘एकोल देस पॉन्ट्स पॅरीस टेक’ विद्यापीठातून वास्तू विशारद (आर्किटेक्ट) अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. भारतातून नमिता मुंदडा यांच्यासह केवळ दोन विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले होते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नुकतेच त्यांना विद्यापीठाच्या वतीने पदवी प्रदान करण्यात आली.
नमिता मुंदडा यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील कमला रहेजा अभियांत्रिकी महाविद्यालयातून वास्तू विशारद अभ्यासक्रमात पदवी प्राप्त केली. सध्या मुंबई येथे त्यांची ‘दि इव्हॉल्युश ब्युरो’ नावाने कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांचे डिझाईन तयार करण्यात येते. नमिता मुंदडा यांनी दिलेल्या एका इमारतीच्या डिझाईनचे कौतुक ‘इनसाईड आउटसाईड’ या स्थापत्य क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या सर्वात जुन्या राष्ट्रीय मासिकाने देखील केले आहे. मागील वर्षी मुंदडा यांनी ‘मास्टर्स इन इंजिनिअरींग ॲण्ड आर्किटेक्चर’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पॅरीस येथील ‘एकोल देस पॉन्ट्स पॅरीस टेक’ विद्यापीठात प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमासाठी जगभरातून केवळ ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
भारतातून नमिता मुंदडा यांच्यासह केवळ दोन विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले. प्रत्येक महिन्यातील किमान सात दिवस विद्यापीठात राहून हा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते. तर, इकडे विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यामुळे मतदार संघात संपर्कात राहणे गरजेचे होते. मात्र, नमिता मुंदडा यांनी ही दोन्ही आव्हाने लीलया पार केली. मतदार संघातील संपर्क कमी न होऊ देता प्रत्येक महिन्यात पॅरीस येथे सात दिवस देऊन त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नुकतेच त्यांना विद्यापीठातर्फे मास्टर्स पदवी प्रदान करण्यात आली. एवढेच नव्हे तर विद्यापीठात सर्वाधिक गुण घेणाऱ्या तिघांमध्ये त्यांचा समावेश आहे. नमिता मुंदडा यांनी परदेशात जाऊन प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.