गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे 16 सप्टेंबरला पारितोषिक वितरण

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने ‘गणेशोत्सव-2019′ निमित्ताने घेण्यात आलेल्या प्रबोधनपर आरास देखावा व मिरवणूक आरास देखावा स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना सोमवार,दि.16 सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण करून प्रोत्साहित करण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष रचनाताई सुरेश मोदी, उपनगराध्यक्षा सविताताई अनंत लोमटे, मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांनी दिली आहे.

सोमवार,दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राजश्री अशोक मोदी, भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या संगीताताई दिलीप काळे, पालिकेच्या सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते होणार आहे. तरी अंबाजोगाई शहरातील ज्या गणेश मंडळांनी नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. अशा सर्व मंडळांनी पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अंबाजोगाई नगरपरीषदेच्या वतीने करण्यात येत आहे.