भूपाल पंडित
अभिनेता आयुष्यमान खुराणाने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. ‘आर्टीकल 15’, ‘अंधाधून’ नंतर आयुष्यमान नवीन काय घेऊन येणार याची त्याच्या चहात्यांना उत्सुकता लागलेली होती. ‘ड्रीम गर्ल’ चा ट्रेलर आल्यानंतर त्याच्या व्यक्तीरेखेची आणि चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
‘ड्रीम गर्ल’ ही कथा आहे मथुरेत राहणार्या करण (आयुष्यमान खुराणा) या मुलाची. लहानपणापासून त्याला मुलींचे आवाज काढण्याची कला अवगत आहे. या काळेमुळे त्याला रामलीलामध्ये सीतेची, महाभारतात द्रोपदीची भूमिका मिळत असते. मात्र ही गोष्ट त्याचे वडील जगजीत (अनु कपूर) यांना आवडत नाही. एम.ए., एम. फील शिक्षण झालेला करण नोकरीच्या शोधात आहे, एके दिवशी त्याला कॉल सेंटर मध्ये नोकरी मिळते आणि खरी गंमत सुरू होते. या नोकरीत तो पूजा नावाची मुलगी बनून लोकांशी फोनवर संवाद साधतो. ही गोष्ट फक्त त्याचा जिवलग मित्र स्माईलीला (मनजोत सिंग) माहित आहे. याच दरम्यान करणाच्या आयुष्यात माही (नुसरत भरुचा) ची एंट्री होते. पुजा अर्थात करणाच्या आवाजाने पोलीस हवालदार राजपाल (विजय राज), माहीचा भाऊ महेंद्र(अभिषेक बनर्जी), किशोर टोटो( राज भंसाली), रोमा (निधी बिष्ट) एवढेच नाही तर त्याचे वडील जगजीत सुद्धा प्रेमात पडतात. या सगळ्यांना पूजाशी लग्न करायचे आहे. पुढे नक्की काय होत हे जाणून घेण्यासाठी ‘ड्रीम गर्ल’ बघायला हवा.
लेखक राज शांडिल्यचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘ड्रीम गर्ल’ची कथा फारशी काही पुढे सरकत नाही. मात्र उत्तरार्ध कथानकाला वेग येतो आणि प्रेक्षक त्यात गुंतून जातात. आयुष्यमान आणि नुशरतचा लव्ह ट्रॅक एका गाण्यातून खुलत जातो. यामुळे कथेची गाडी मुख्य ट्रॅकवरुन घसरत नाही. कथेला उत्तम पटकथा आणि संवादाची साथ लाभलेली आहे.
कलाकारांच्या अभिनयाबाबत सांगायचे तर आयुष्यमान खुराणाने करणच्या भूमिकेवर आपली छाप सोडली आहे. पूजाचे कॅरेक्टर आयुष्यमाननक अप्रतिमरित्या तिच्या बोलण्यातून आणि बॉडी लँग्वेजमधून जे सादर केले आहे, त्याच्या प्रेमात तुम्ही पडता. ‘शुभ मंगल सावधान’, ‘बरेली की बर्फी’, ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’, ‘आर्टिकल 15’ आणि आता ‘ड्रीम गर्ल’हा त्याच्या अभिनयाचा चढता आलेख आहे. नुसरतच्या भूमिकेला फार काही वाव नसला तरी तिच्या वाटेला आलेली भूमिका तिने यशस्वीरित्या साकारली आहे. आयुष्यमान आणि नुसरतची केमिस्ट्रीही छान जमली आहे. अन्नू कपूर, विजय राज यांनी धमाल केली आहे. मनजीत सिंग, अभिषेक बॅनर्जी, निधी बिष्ट, राज भंन्साळी यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
मीत ब्रदर्सचे ‘राधे राधे’ हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. इतर गाणीही चांगली आहेत. उत्तम कथानक त्याला मिळालेली कलाकारांची दमदार साथ यामुळे ‘ड्रीम गर्ल’ एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट झाला आहे.
चित्रपट – ड्रीम गर्ल
निर्मिती – बालाजी टेलिफिल्म्स
दिग्दर्शक – राज शांडिल्य
संगीत – मीत ब्रदर्स
कलाकार – आयुष्यमान खुराणा, नुसरत भारुचा, अन्नू कपूर, विजय राज, मनजीत सिंग, अभिषेक बॅनर्जी, राजेश शर्मा
रेटींग – 3.5