ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे बीड जिल्हयातील शेती, पाणंद रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी

अकराही तालुक्यात होणार रस्ते ; १ हजार ४१६ कामांना मंजूरी ; सुमारे ३५ कोटीचा दिला निधी

बीड : राष्ट्रीय, राज्य आणि ग्रामीण रस्त्यांबरोबरच राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी शेतक-यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला शेती/ पाणंद रस्त्याचाही प्रश्न आता सोडविला आहे. रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हयातील अकराही तालुक्यांमध्ये ही कामे होणार असून त्यासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी दळण वळण सुलभ व्हावे यासाठी राष्ट्रीय आणि राज्य मार्गासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण रस्त्याचाही प्रश्न त्यांनी मार्गी लावला, आज जिल्हयात सर्वत्र चहुकडे रस्त्याचे जाळे त्यांनी विणले. शेतक-यांच्या दैनंदिन जीवनाशी व शेती कामांशी निगडित असलेला पाणंद रस्त्याचा प्रश्नही त्यांनी मार्गी लावला आहे. पाणंद रस्ते खराब असल्याने शेतक-यांना शेती व शेती मालाची वाहतूक करतांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते, परंतु ना. पंकजाताई मुंडे यांनी शेतक-यांची ही अडचण आता दूर केली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत पालकमंत्री शेती / पाणंद रस्ते योजनेतून पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नुकतेच १ हजार ४१६ कामे मंजूर करून त्यासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिका-यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या सर्व कामांना मंजूरी देण्यात आली. पाणंद रस्ते मंजूर झालेल्या कामांची तालुकानिहाय संख्या अशी, बीड ४८१, परळी २०९, गेवराई १८१, पाटोदा १७५, शिरूर ११६, धारूर ७१, वडवणी ४९, केज ४६, अंबाजोगाई ३७, माजलगांव ३६ व आष्टी तालुक्यात १५ पाणंद रस्ते मंजूर झाले आहेत. सदर पाणंद रस्त्यांमुळे शेतक-यांची समस्या दूर होणार असून गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडविल्याबद्दल जिल्हयातील तमाम शेतकरी बांधवांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.