अंबाजोगाई : शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात गांधीगिरी करत पायी मोर्चा काढला. हा मोर्चा अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील शेतकऱ्यांनी काढला असून मोर्चात आपेगाव, अंजनपूर, धानोरा, कोपरा गावच्या शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता. काही गावे पीकविम्यापासून वंचित असून याकडे कृषी कार्यालय आणि संबंधी विमा कंपनी लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यात संताप असून त्वरीत पीकविमा द्या या मागणीसाठी आपेगाव ते अंबाजोगाई असा शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढला. हा मोर्चा आज दि 13 सप्टेंबर 19 रोजी सकाळी 8: 30 वाजता आपेगावातून अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
आपेगाव येथील शेतकऱ्यांनी गतवर्षी ऑनलाइन पीकविमा भरलेला आहे. तसेच गतवर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळाची दाहकता असल्याने शेतकऱ्यांच्या हातातून पिके गेली आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते. आपेगाव परिसरातील इतर गावात विमा कंपनीने विमा वाटपही केला आहे, परंतु केवळ आपेगाव पीक विम्यापासून वंचित असून कृषी कार्यालय आणि संबंधित कंपनी यावर बोलण्यास तयार नाही. शेतकऱ्यांनी वारंवार विमा देण्याची मागणी केली, परंतु विमा कंपनी विमा वाटप करण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा विमा त्वरीत देण्यात यावा अन्यथा दि. १३ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आपेगाव ते अंबाजोगाई असा पायी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाने आणि विमा कंपनीने याची दखल घेतली नसल्याने हा 25 किलोमीटर अंतराचा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सुदर्शन शिंदे, संतोष शिंदे, संतोष पवार, अशोक शिंदे, वासुदेव तट, नरेंद्र तट, उत्तम शिंदे, बाळासाहेब शिंदे, कल्याण तट, दिगांबर शिंदे, रंगनाथ तट, धनंजय काळे, संजय तट, दत्तात्रय तट, धर्मराज शिंदे, पाडुरंग तट, भास्कर शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले.