उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राचार्यांच्या स्वाक्षरीने झाले सहा महिन्याचे पगार
अंबाजोगाई : येथील टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गेली वर्षभरापासून सुरु असलेला तिढा औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने नुकताच सुटला असून गेली अनेक महिन्यापासुन कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगारापैकी सहा महिन्याचा पगार प्राचार्य बी. आय .खडकभावी यांच्या स्वाक्षरीने नुकताच झाला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कामकाज पुर्ण क्षमतेने पाहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असल्यामुळे प्राचार्य खडकभावी यांचे अनेकांनी अभिनंद केले आहे.
अंबाजोगाई शहरात १९९३ साली लातुर येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यात आले होते. या महाविद्यालयाच्या उभारणीत, जडण घडणीत आणि या महाविद्यालयाचा शैक्षणिक स्तर ऊंचावण्यात प्राचार्य बी. आय. खडकभावी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. असे असतांना शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचा वाद गेली अनेक वर्षांपासून धर्मादाय आयुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरु असतांना आपणच विजयी झालो असा दावा करणाऱ्या संचालक मंडळाने शिक्षण संस्थेचा कारभार पाहण्यास सुरुवात केल्यानंतर प्राचार्य खडकभावी यांना नाहक त्रास देण्याचा उद्योग सुरु केला. या सोबतच संचालक मंडळाने प्राचार्य खडकभावी यांचे आर्थिक व्यवहाराच्या सह्यांचे अधिकार ही संचालक मंडळाने काढुन घेतले होते. परीणामी या महाविद्यालयातील सर्व कामकाज व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. या सर्व त्रासाला कंटाळून प्राचार्य खडकभावी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करुन या महाविद्यालयाच्या कामकाज धर्मादाय आयुक्तांच्या ॲप्रयुअल सहमती आदेश या संचालक मंडळास मिळेपर्यंत आपल्या महाविद्यालयीन प्रशासनाच्या कामकाजात अडथळे आणण्यास शिक्षण संस्थाचालकांना पाबंद करावी अशा आशयाची याचिका दाखल केली होती.
सदरील याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या न्या. गंगापुरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने संबंधित संस्थाचालकांकडे धर्मादाय आयुक्तांची या संस्थेचा कार्यभार पाहण्यासाठीचा अनुमती आदेश येईपर्यंत टी.बी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कामकाज हस्तक्षेप करु नये आणि विदयमान प्राचार्य बी.आय. खडकभावी यांना पुर्वीप्रमाणेच महाविद्यालयाचे संपुर्ण कामकाज त्यांच्याच स्वाक्षरीने करण्यास अडथळा आणू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राचार्य बी. आय. खडकभावी यांनी महाविद्यालयाचे कामकाज पुर्वीप्रमाणे पाहण्यास सुरुवात केली असून काल त्यांच्या स्वाक्षरीने महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांचा थकलेला पगार आदा केला आहे. टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक अंबाजोगाईच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला असल्यामुळे संपुर्ण अंबाजोगाईकर या प्रकरणात प्राचार्य खडकभावी यांच्या सोबत होते. परीणामी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राचार्य बी.आय. खडकभावी यांनी महाविद्यालयाचे कामकाज पुर्वीप्रमाणेच पुर्ण क्षमतेने सुरु केले असल्यामुळे अनेकांनी प्राचार्य खडकभावी यांचे अभिनंदन केले आहे.