उपाध्यक्षपदी प्रकाश सोळंकी यांची एकमताने निवड
माझ्यावर पुन्हा टाकलेल्या विश्वासामुळे सर्व संचालक व ग्राहकांचे आभार : राजकिशोर मोदी
अंबाजोगाई : अंबाजोगाई पिपल्स को – ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून प्रकाश सोळंकी यांची देखील निवड एकमताने बिनविरोधपणे करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक तथा अध्यासी अधिकारी, सहकारी संस्था, बीड समृत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सर्व संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्षपदी राजकिशोर मोदी तर उपाध्यक्ष म्हणून प्रकाश सोळंकी यांची बिनविरोध अशी निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत राजकिशोर मोदी यांच्यासह प्रकाश सोळंकी, वसंत चव्हाण, पुरुषोत्तम चॉकडा, शेख दगडू, अरुण काळे, सुरेश मोदी, संकेत मोदी, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे, श्रीमती वनमाला रेड्डी व स्नेहा हिवरेकर उपस्थित होत्या.
अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, मागच्या सव्वीस वर्षाच्या यशस्वी घोडदौडीवरून अंबाजोगाई पिपल्स बॅक ही महाराष्ट्रासाठी एक दीपस्तंभ अशीच ठरली गेली असल्याचे दिसून येत आहे. सहकार क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या अंबाजोगाई पिपल्स को – ऑप. बँक लि. च्या अध्यक्षपदी आज माझी पुन्हा बिनविरोध निवड केल्याने सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करून सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.
या निमित्तानं सर्वसामान्यांच्या विकासाच्या पालखीचे भोई होता आले, याचा जितका आनंद आहे, तितकीच मोठी जबाबदारीही आहे, ही जाणीव मनात ठेवून आजपासून लगेचच कामकाजाला सुरवात करत असल्याचे देखील मोदी यांनी स्पष्ट केले.