संविधान दिनाचा विसर पडलेल्या नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करा

शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र विकास आघाडी, भारतीय जनता पार्टी, शिवसंग्राम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोकजनशक्ती पार्टी, प्रहार, रिपाइं(आठवले), डीवायएफवाय युवा आघाडी सहीत सर्व पक्षीय मागणी

उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

अंबाजोगाई : संविधान दिनाचा विसर पडलेल्या नगरपरिषद अंबाजोगाईचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी बहुतांश राजकीय पक्षांनी केली आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना आज  दिनांक 28 नोव्हेंबरला निवेदनही देण्यात आले. 

उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, अंबाजोगाई नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अशोक साबळे यांना चक्क संविधान दिनाचा विसर पडला व ते चक्क संविधान दिनी कार्यालयात अनुपस्थित राहिले असल्याचा गंभीर प्रकार घडला असल्याने, संविधान दिनाचा विसर पडलेल्या मुख्याधिकारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय व नागरिकांच्या वतीने आपणास करण्यात येत आहे.

दिनांक 26 नोव्हेंबर 1950 साली आपल्या देशाने संविधान स्विकारले. तेव्हापासून संविधान दिन  साजरा केला जातो. प्रत्येक शासकीय कार्यालयात हा दिन साजरा करावा, असे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र, अंबाजोगाई नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी अशोक साबळे यांना व त्यांच्या प्रशासनाला तर चक्क संविधान दिनाचा विसर पडला, ही बाब अत्यंत गंभीर व निंदनीय आहे. यावरून एकच लक्षात येते की, त्यांनी हे कृत्य जाणूनबुजून केले असावे.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या आवारात लाखो रुपये खर्च करून संविधान स्थंब बांधण्यात आला आहे.  दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी त्या स्थंबाची साधी स्वच्छता सुद्धा नगरपरिषद विभागाकडून करण्यात आली नाही. अंबाजोगाई शहरातील पत्रकार बांधव यांनी संविधान स्थंबाची स्वच्छता करून संविधान स्थंबाला पुष्प अर्पण करून संविधान दिन साजरा केला. त्यानंतरही नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी यांना जाग आली नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. उपजिल्हाधिकारी महोदय नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे हे आपल्या आदेशाला सुद्धा मानत नाहीत. असे बऱ्याचवेळा आपल्या निदर्शनास आले आहे. आपणही त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात का येऊ नये, असा पत्रव्यवहार मुख्याधिकारी अशोक साबळे यांना केला होता. यापूर्वीही अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणे संबंधित मुख्याधिकारी यांची गाजत आहेत. त्यामुळे शहराची प्रतिमा मलीन झाली आहे. यापूर्वीही शहरातील समस्या व भ्रष्टाचारासंदर्भात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.

मुख्याधिकारी अशोक साबळे यांची कारकीर्द वादग्रस्त राहीली आहे. म्हणून मुख्याधिकारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,अन्यथ अन्यथा मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या विरोधात सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी. असे  सदरील निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण ठोंबरे, कॉंग्रेसचे असिफोद्दीन खतीब (बाबा), शिवसेनेचे गजानन मुडेगावकर वंचितचे गोविंद मस्के रिपाइंचे महेंद्र निकाळजे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, मनसेचे सुनील जगताप बीड, अमोल जोगदंड, परमेश्वर जोगदंड, अशोक गंडले, शेख फेरोज, अभिजित लोमटे, प्रकाश बोरगावकर, माजी नगरसेवक सुरेश कराड, राजेभाऊ लोमटे, अशोक हेडे, बाबा भिसे, लिंबराज लंके, माऊली वैद्य भाजपच्या वतीने राणा चव्हाण, सुरेश कराड व शिवसेना महिला आघाडीच्या जयश्री पिंपरे, ॲड. सुनीता जोशी, जयश्री मोरे, सुनीता जाधव यांच्यासह पदाधिकारी, इतर आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.