कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
अंबाजोगाई : येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात 24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व शेती विषयाचे अभ्यासक अमर हबीब म्हणाले की, आपली आई ही सकाळपासून रात्रीपर्यंत नि:स्वार्थी वृत्तीने, कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्याला लहानाचे मोठे करते. म्हणून आपल्या जीवनात ती अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते. आपली आई प्रथम समाजसेवीका असते. आपण देखावा म्हणून समाजसेवा करू नये. भारतातील थोर समाजसेविका सावित्रीमाई फुले, मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
सेवा ही दुस-यांसाठी करायची नसून आपल्या आंतरीक आनंदासाठी असली पाहिजे. कोणाला आर्थिक मदत केली. म्हणजे सेवा नव्हे तसेच आपल्यातील स्नेहभाव वृद्धिंगत केला पाहिजे, दुसऱ्याचे दु:ख समजून घेणे व त्यावर मात करण्यासाठी आपण सरसावले पाहिजे असे त्यांनी सांगितले. शेजार धर्म व मैत्री वाढवा. समाजसेवेतून स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा असे प्रतिपादन अमर हबीब यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अखिला सय्यद या होत्या. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ. अखिला सय्यद असे म्हणाल्या की, विद्यापीठ अनुदान आयोग व मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू झाला. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षांपासून महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू झाला. या माध्यमातून बलशाली व सशक्त भारत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमध्ये सेवाभाव निर्माण होतो असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. अखिला सय्यद यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. अलका वालचाळे म्हणाल्या की, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्रासाठी झाला पाहिजे, तसे संस्कार राष्ट्रीय सेवा योजनेत केले जातात. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असे डॉ. वालचाळे यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पीएच.डी. मिळाल्याबद्दल प्रा.संध्या ठाकरे यांचाही ह्रद्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. यशवंत चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.दिलीप मस्के यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापिका आणि स्वयंसेविका विद्यार्थीनी उपस्थित होत्या.