राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विनोद रापतवार यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला उदघाटन

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने २७ सप्टेंबर २०१९ शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या माजी प्राचार्य स्व. भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन जैन एरीगेशन कंपनीचे मुख्य समन्वयक विनोद रापतवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेवू शकतात. या स्पर्धेसाठी “संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षांची भुमिका आणि आवश्यकता” तसेच “मानवी हक्क संकल्पना आणि वास्तव ३७० व ३५ अ या कलमाचे निरसन आणि त्याचे प्रादेशिक राष्ट्रीय – आंतराष्ट्रीय पडसाद” या विषयांवर ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेतील विजयी ठरणाऱ्यांसाठी प्रथम स्पर्धकास रोख रु.५०००/- (पाच हजार रुपये), व्दितीय स्पर्धकास रोख ३०००/- (तीन हजार), तर तृतीय स्पर्धकास रोख २०००/- (दोन हजार रुपये) आणि उत्तेजनार्थ स्पर्धकासाठी रोख १५००/- (एक हजार पाचशे) व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तसेच फिरता चषक प्रथम येणाऱ्या विजेत्या संघास देण्यात येईल.

या महाविद्यालयाचे २०१९ – २० हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे या कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करण्याचा मानस आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विनोद रापतवार मुख्य समन्वयक सी.एस.आर. जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यो.शि.सं. अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार दै.विवेक सिंधूचे संस्थापक संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ तर अभिजित जोंधळे हे समारोपीय समारंभ व बक्षीस वितरणसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नागपुरकर सभागृह येथे होत असून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धकांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या परवानगी पत्रासह उपस्थित रहावे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील दोन स्पर्धकांना या स्पर्धेसाठी दि.२७/०९/२०१९ शुक्रवार रोजी पाठवावे. असे आवाहन या स्पर्धेचे संयोजक स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रमेश सोनवळकर तसेच पदव्युत्तर विभागाच्या संचालिका प्रा. डॉ.शैलजा बरुरे यांनी केले आहे.