अंबाजोगाई शहरापासुन सहा किलोमीटर अंतरावर अंबाजोगाई – परळी राज्य रस्त्या नजीक पिंपळा धायगुडा येथे गेल्या काही वर्षांपासुन जीवन आधार भक्तीप्रेम आश्रम हा विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विस्थापित झालेल्या वृद्धांसाठी आशेचा किरण बनला आहे. घरातुन हद्दपार झालेले वृद्ध यांना या आश्रमाने खर्या अर्थाने आधार दिला आहे. अपार कष्ट सोसल्यानंतर आयुष्याचा उत्तरकाळ सुखात जावा ही प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. परंतु,वय वाढले, व्यक्ती वृद्ध झाला की त्याला घर खायला उठते असे म्हणतात. त्यामुळे अनेकांच्या पदरी म्हातारपणी तशीही निराशाच येते. अशा वृद्धांना आपुलकीने कुटुंबाप्रमाणे सांभाळ करून आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर हे सध्या 29 वृद्धांचा सांभाळ करीत आहेत. कसले ही शासकीय अनुदान वा सरकारी मदत नसताना केवळ लोकांच्या पाठबळावर गेल्या तीन वर्षांपासुन गिरवलकर हे सामाजिक बांधिलकी माणून जीवन आधार भक्तीप्रेम आश्रमासाठी स्वतःला वाहुन घेत समाजकार्य करीत आहेत.
येथील मानवलोकचे संस्थापक स्व.डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या सानिध्यात राहुन पवन गिरवलकर यांनी वृद्धांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. अंबाजोगाई परिसरात वृद्धाश्रम काढायचा या भूमिकेतुन त्यांनी कार्य सुरू केले. त्यांच्यातील समाजाविषयी असलेली बांधिलकी पाहुन समस्त महाजन ग्रुपचे अध्यक्ष गिरीषभाई शहा यांनी केलेले मार्गदर्शन तसेच देवेंद्र जैन, नुतन देसाई, पृथ्वीराज कावेरीया, अल्पेश जैन, भारतीय जैन संघटनेचे धनराज सोळंकी यांच्या माध्यमातून व जनतेच्या पाठबळावर गिरवलकर यांनी जीवन आधार भक्तीप्रेम आश्रम सुरू केला. सोबतच गोशाळा ही सुरू केली. या आश्रमात वृद्धच प्रत्येक कार्यासाठी पुढाकार घेतात. हा आश्रम संपुर्णपणे कुटुंबासारखा आहे.
15 ऑगस्ट 2016 रोजी सुरू झालेल्या आश्रमाची वाटचाल तशी बिकटच म्हणायला पाहिजे. मोजक्या दानशुर व्यक्तीच्या पाठबळावर आश्रमाचा विज बिल खर्च, भाजीपाला, इंधनाचा खर्च तसेच महिन्याला लागणारा किराणा, वृद्धांचे औषोधोपचार, पाणी तसेच काही महिन्यांपुर्वी रूग्ण वाहिकाही आश्रमाला दात्यांनी दिली. असे असले तरी दैनंदिन खर्च भागविणे ही तारेवरची कसरत आहे. गोशाळेचा खर्च मोठ्या प्रमाणावर असून आता गरज आहे ती दानशुर व्यक्तींच्या आर्थिक पाठबळाची या वृद्धाश्रमात वृद्धांना दोन वेळचे जेवण, चहा, आरोग्य सोयी,मोफत पुरविल्या जातात. प्रार्थना आणि श्रमदान असा आश्रमाचा नित्याचा दिनक्रम आहे. या आश्रमात एकही कर्मचारी नाही ही विशेष बाब आहे. आश्रमात राहण्यासाठी वृद्धांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. वृद्धांसोबतच विधवा, अनाथ मुले व दिव्यांगांसाठीही मायेची सावली या आश्रमात मिळत आहे. हाकेला धावून जाणारे सेवानिष्ठ संस्थाचालक पवन गिरवलकर यांनी लावलेल्या या रोपट्याचा भविष्यात वटवृक्ष होणार आहे.
समाजातील दानशुर व्यक्तींनी ज्याच्याकडे जे आहे ते मनःपुर्वक दान करावे. मानवता देव समजून जीवन आधार भक्तीप्रेम आश्रमाला भरभरून मदत देता येईल यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. आज या आश्रमात 29 वृद्ध असून त्यात 20 पुरूष व 9 महिला आहेत तसेच आश्रमाच्या वतीने गोशाळा बांधण्यात आली असून त्यात सध्या 15 गायी व आश्रमाच्या परिसरात विविध 55 वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या आश्रमात सातत्याने वाढदिवस, पुण्यतिथी आदी समारंभ साजरे होतात. समस्त महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार पवन सोमनाथअप्पा गिरवलकर हे जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरीकांची सेवा करीत आहेत.
आश्रमासाठी दैनंदिन खर्च भागविणे ही तारेवरची कसरत आहे. गुरांसाठी चारा तसेच दैनंदिन खर्चासाठी निधीची कमतरता भासत असल्याने जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाला आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्याकरीता इच्छुक दानशुर व्यक्ती व दात्यांनी सढळ हस्ते जीवनआधार स्वास्थ सेवाभावी संस्था,बँक ऑफ बडोदा,शाखा अंबाजोगाई खाते क्रमांक- 09880200000635 (आयएफएससी कोड – बीएआरबीझीरोएएमबीबीएचआय) या खात्यावर आपली आर्थिक मदत,देणगी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
दखल – रणजित डांगे,
7350200900