अंबाजोगाईच्या महिला छात्र सैनिकांची गगनभरारी

दीड हजार छात्रांना दिले देश रक्षणाचे धडे

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील राष्ट्रीय छात्रसेनेत महिला छात्रांनी राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली. काही युवती संरक्षण सेवेत दाखल झाल्या. योगेश्वरी महाविद्यालयात मागील सत्तावीस वर्षात दीड हजार माहिला छात्रांना देश रक्षणाचे धडे देण्यात आले. चारित्र्य, शिस्त, सेवा, नेतृत्वगुण, साहसी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने १९४८ साली एन.सी.सी. ची स्थापना केली. सैन्यदलात भरती होण्यासाठी छात्रांना प्रोत्साहन देण्यात येते. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी व मुल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न एनसीसीच्या माध्यमातून करण्यात येतो. येथील योगेश्वरी महाविद्यालयात १९९३ पासून माहिला एनसीसी प्लाटूनच्या माध्यमातून १४५८ माहिला छात्रांना देश संरक्षणाचे धडे देण्यात आले. यात काही माहिला छात्रांनी गगनभरारी घेतली.

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे आयोजित राजपथावरील राष्ट्रीय संचलनात काही जणी सहभागी झाल्या. राष्ट्रीय पातळी गाठण्यासाठी सहा महिने परिश्रम व कठोर मेहनत घ्यावी लागते. यात ऋचा कुलकर्णीला राष्ट्रीय पुरस्कार (डी.जी.मेडल) मिळाले. महिला छात्र प्रज्ञा भोसले, स्नेहषा वीर, सुषमा पाटील, दिपाली महाजन, मोनिका नाईकवाडे, रचना परदेशी, शितल आवटे यांना दिल्ली येथे राजपथावर राष्ट्रीय पथसंचलनात संधी मिळाली. ज्योत्स्ना गाढवे, भाग्यश्री निरडे, आशालता इरलापल्ले, सुजाता काशीकर, उत्तरा शिंदे या पोलिस व संरक्षण दलात रुजू झाल्या आहेत. शिक्षणाबरोबर संस्कार घडविण्याचे काम योगेश्वरी शिक्षण संस्था करते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या प्रेरणेने युवतींसाठी दरवर्षी महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येते. त्यात कराटे, योगासने, लाठी, तलवारबाजीचे प्रशिक्षण देण्यात येते.

राष्ट्रीय छात्रसेनेचे सेक्टर प्रमुख मेजर एस. पी. कुलकर्णी छात्रांवर देशसेवेचे संस्कार करतात. बीड जिल्हयात पहिला सेव्हन गर्लस् महिला छात्रांचा प्लाटून सत्तावीस वर्षापूर्वी सुरू झाला. यात अनेक छात्रांनी प्रशिक्षण पूर्ण करून बी आणि सी परीक्षेत यश संपादन केले. मैदानावर रनिंग करणे, कवायत व परेडमध्ये सहभागी होणे, विविध शहरात होणाऱ्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन उत्साहाने महिला छात्र आपली कामे करताना दिसतात. शहरातील विविध महाविद्यालयात जाऊन युवतींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करून प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येतो. विविध राष्ट्रीय व सामाजिक उपक्रम घेऊन हा माहिला छात्रांचा प्लाटून चालविला जातो. एनसीसीच्या माध्यमातून छात्रांना संस्कार व आत्मसन्मान देण्यात येतो. श्रमप्रातिष्ठेविषयी माहिती देण्यात येते. वृक्षारोपन, जलसाक्षरता, पर्यावरण, स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबविण्यात येतात. मन, मनगट, मेंदू मजबूत करून क्षमतांचा विकास केला जातो. सर्व छात्रांना एकसारखा ड्रेस देण्यात येतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला जातो. त्यांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येते.

यात फायरिंग, ड्रील, आपत्ती व्यवस्थापन, सैनिकीप्रशिक्षण देण्यात येते. राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध प्रशिक्षण शिबीरे घेण्यात येतात. त्यात सहभागी झालेल्या छात्रांना त्या परिसरातील संस्कृतीची ओळख होते. ग्रामीण भागातून आलेल्या छात्रांना प्रशिक्षण देण्यात येते. आजपर्यंत आठ माहिला छात्रांनी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. ज्योत्स्ना गाढवे हिने भारतीय सैन्यदलात प्रवेश करून देश संरक्षणाचे काम हाती घेतले. भाग्यश्री निरडे हिने वनविभागात वनसंरक्षणाची जबाबदारी घेतली. आशा शिंदे, सुजाता काशीकर, अभिलाषा इरापल्ले यांनी पोलिस दलात नोकरी स्वीकारली. दिपाली महाजनने ‘नासा’ राष्ट्रीय विज्ञान संस्थेत कार्य केले. अनेक महिला छात्रांना विविध शिष्यवृत्ती मिळाल्या. प्रा. मेजर एस.पी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला छात्रांना छात्रसेनाधिकारी प्रा. डॉ. भारती देशपांडे, प्रा. डॉ. साधना चामले, प्रा. तलखडकर, प्रा. जया महाजन, प्रा. ए. बी. जोशी, प्रा. निलिमा कुमठेकर यांनीही मार्गदर्शन केले.