टीम AM : ‘चांदनी’ चित्रपट आजच्या दिवशी 34 वर्षांपुर्वी म्हणजेच 14 सप्टेंबर 1989 रोजी यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला. त्रिकोणी प्रेमकथेवर आधरित असलेल्या ‘चांदनी’ चित्रपटाला मोठे यश मिळाले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्मिते होते यश चोप्रा. या चित्रपटाची कथा सागर सरहदी यांनी लिहीली होती. ‘चांदणी’ चित्रपटाच्या वेळेची एक गंमत अशी की, काही कारणांमुळे यश चोपडा यानी संवाद लेखक म्हणून दुसऱ्या कुणालातरी कामावर घेतले होते. त्यांनी लिहिलेल्या संवादासमवेत आऊट डोअर शूटिंगला जेव्हा चित्रपट गेला, तेव्हा यश चोपडा यांच्या लक्षात आलं की, आपल्याला हवे तसे रोमॅटिंक संवाद यात नाहीयेत. त्यांनी सागर सरहदी यांना एक मेसेज पाठविला. जर ते या चित्रपटाची कथा लिहिणार नसतील तर ते हा चित्रपटच करणार नाहीत. या चित्रपटातील श्रीदेवीच्या शिफॉन साड्यांचे खूप कौतुक झाले होते.
या चित्रपटाचे संगीत अतुलनीय हिट ठरले. ‘चांदनी’ मधील श्रीदेवी यांचा पूर्ण लूक ऑस्कर विजेता कॉस्ट्यूम डिझायनर भानु अथैयाने तयार केला होता. मात्र, चित्रपटाच्या मध्येच यश चोप्रा यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काम सोडले. यातील प्रमुख कलाकार होते श्रीदेवी, ऋषी कपूर, विनोद खन्ना, अनुपम खेर, वहिदा रेहमान, सुषमा सेठ, जुही चावला. या चित्रपटाला संगीत शिव – हरी यांचे म्हणजेच शिवकुमार शर्मा व हरिप्रसाद चौरसीया यांचे होते. चित्रपटाच्या कॅसेट आणि एलपी रेकॉर्ड एक कोटी युनिट संगीत कंपनीने विकले. या चित्रपटाच्या संगीताने रिलीजपूर्वी चार प्लॅटिनम डिस्क मिळवल्या होत्या.
शब्दांकन : संजीव वेलणकर