हेमंत देसाई
टीम AM : नाम शबाना… आज कैफी आझमी यांच्या या लाडक्या लेकीचा वाढदिवस. शबाना चक्क 73 वर्षांची झाली ! श्याम बेनेगलना ती गुरु मानते. त्यांच्याबरोबर अंकुर, निशांत, हरीभरी, अंतर्नाद, मंडी यासारखे चित्रपट तिने केले. ‘अंकुर’ मुळे शबानाला नाव मिळाले. ‘अंकुर’ चे स्क्रिप्ट बेनेगल यांच्याकडे तेरा वर्षे पडून होते. निर्माताच मिळत नव्हता. ‘अंकुर’ मधल्या भूमिकेसाठी श्याम यांनी वहिदा, अपर्णा सेन, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री शारदा आणि अंजू महेंद्रू यांचा विचार केला होता. परंतु काही ना काही कारणाने ते जमले नाही. अखेर कोणीतरी शबानाचे नाव सुचवले. तिला पाहताच श्याम यांनी हीच आपली नायिका आहे, हे ओळखले.
शबानाला श्याम यांनी तेव्हाच ‘अंकुर’ बरोबरच ‘निशांत’ हा चित्रपटही ऑफर केला. तेव्हा शबानाची आई शौकत यांना वाटले की, हा काय फ्रॉड माणूस आहे! याने अद्याप एकही सिनेमा बनवला नाही आणि एकदम दोन – दोन सिनेमाच्या ऑफर घेऊन येतोय हा.. खुद्द बेनेगल यांनीच हा किस्सा एकदा सांगितला होता. त्या काळी शबानाला पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटपाशी बघितल्याचे मला आठवते. अभिनयाचे प्रशिक्षण तिने तिथेच घेतले होते.
जया बच्चनने इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या ‘सुमन’ या डिप्लोमा फिल्ममध्ये काम केले होते. त्यावेळच्या सिनेमातल्या इतर नट्यांपेक्षा शबानाला जयाचे काम वेगळे आणि अस्सल वाटले. आपणही सिनेमात काम करावे, असे तेव्हा तिच्या मनाने घेतले. तिने कैफी साहेबांना ‘मला सिनेमात काम करायचे आहे’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, शबाना, तुला आयुष्यात मनापासून जी गोष्ट करायची आहे, त्यास माझा पाठिंबाच असेल. तुला चपला-बूट शिवायचे काम करायचं असेल, तर ते देखील कर, पण उत्कृष्ट पद्धतीने कर, एवढेच माझे म्हणणे आहे. जे काम करायचे ते जीव ओतून आणि उत्तम पद्धतीने करायचे, हा संस्कार वडिलांनी शबानावर केला.
मग जयाच्या पावलावर पाऊल टाकून शबाना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेली. शबानाचा पहिला वितरित झालेला चित्रपट ‘अंकुर’ असला, तरी तिला पहिल्यांदा सिनेमासाठी करारबद्ध केले होते ते ख्वाजा अहमद अब्बास यांनी ‘फासला’ या चित्रपटासाठी. तसेच कांतीलाल राठोड यांच्या ‘परिणय’ चे शूटिंग ‘अंकुर’ पूर्वी सुरू झाले होते. भारतीय चित्रपट इतिहासातील स्मिता पाटील आणि शबाना या दोघीही कायमच्या लक्षात राहतील, अशा अभिनेत्री आहेत. शबानाने रंगभूमीवरही आपले अस्तित्व दाखवले. फारुख शेखबरोबर तिने ‘तुम्हारी अमृता’ केले. ढोबळ आणि बटबटीत अभिनयापेक्षा टोकदार, संयत आणि अर्थपूर्ण अभिनय करण्यात शबानाचा हात कोणीही धरू शकणार नाही.
कित्येक वर्षांपूर्वी एकदा मी लोकलने बोरीबंदर निघालो असताना, माझ्या डब्यात शबाना बसलेली होती. त्यावेळी समांतर व व्यावसायिक दोन्ही चित्रपटांतून तिचे नाव झाले होते. तरीदेखील ती लोकलने एकटीच प्रवास करत होती.. त्यावेळी तिच्याशी मी बोललोही होतो. आणखी एकदा तिच्या ‘जानकी कुटीर’ मध्येही जाण्याचा योग आला होता. असो. आज वाढदिवसानिमित्त शबानाला मनापासून शुभेच्छा!.
(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत.)