शुभश्री जाधव विद्यापीठात सर्व शाखेतून सर्वप्रथम
11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ; 257 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
अंबाजोगाई : महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयतील विद्यार्थ्यांनी यावर्षीही विद्यापीठ परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत गगनभरारी घेतली आहे. महाविद्यालयाचे 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले तर 257 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक अॅण्ड पॉवर या शाखेची शुभश्री सुनिल जाधव ही विद्यार्थीनी विद्यापीठात सर्व शाखेतून सर्वप्रथम आली आहे तर निखिल वट्टमवार हा इन्स्टुमेंन्टेशन शाखेचा विद्यार्थी विद्यापीठात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शहरातील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2019 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत दैदीप्यमान कामगिरी करत सलग नवव्या वर्षी आपल्या गुणवत्तेची यशस्वी छाप विद्यापीठाच्या निकालावर उमटविली आहे. या परीक्षांचे निकाल व गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांची नावे महाविद्यालयास नुकतीच प्राप्त झाली आहेत. त्यानुसार विद्यापीठीय निकालात निखिल वट्टमवार या विद्यार्थ्यांला इन्स्ट्रुमेंटेंशन इंजिनीअरिंग या शाखेत सुवर्णपदक जाहीर झाले तर शुभश्री सुनिल जाधव ही विद्यार्थीनी विद्यापीठ अंतर्गत येणार्या सर्व महाविद्यालय व सर्व शाखेतुन सर्वप्रथम आल्याबद्दल तिला डॉ.सुग्गु.एस.मुर्ती सिनिअर सॉईल इंजिनीअर यान्हा सेनव्हाईया इन्स्टिट्युट, सौदी अरेबिया यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून हे सुवर्णपदक व स्व.प्रा.झेड.एच.चौंडीवाल स्मृती पारितोषिक देखील दिले जाणार आहे. सिव्हिल शाखेच्या गुणवत्ता यादीत सई गुंडेराव कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक मिळविला व स्नेहल कोकाटे हीने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सिव्हिल शाखेत सर्वाधिक गुण घेणार्या सई गुंडेराव कुलकर्णी या विद्यार्थीनीला उद्धवराव नानासाहेब देशपांडे हे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच तिला कृष्णाजीराव दत्तात्रयराव सांगवीकर हे पारितोषिकही विद्यापीठातून महिला विद्यार्थ्यींनी म्हणून सिव्हिल शाखेत सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल देण्यात येणार आहे.
कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग या शाखेत प्रथम आल्याबद्दल अश्विनी वैजनाथ आपेट या विद्यार्थीनीला स्व.प्रा.झेड.एच.चौंडीवाल स्मृती पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रीकल,इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड पॉवर या शाखेच्या गुणवत्ता यादीत पहिले 5 विद्यार्थी हे अंबाजोगाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आहेत. त्यात शुभश्री सुनिल जाधव, आकाश शिवाजी सिरसाट, मेघना अशोक गुप्ता, अश्विनी मेघराज सावरे, अश्विनी सुभाष मुंडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शाखेत सर्वाधिक गुण घेणार्या शुभश्री सुनिल जाधव हिला प्रा. झेड. एच. चौंडीवाल स्मृती पारितोषिक देण्यात येणार आहे, तसेच तृतीय क्रमांक प्राप्त करणार्या मेघना अशोक गुप्ता हिला महेंद्र मधुकर कुरूंदकर स्मृती पारितोषिक देण्यात येणार आहे. या सोबतच इन्स्टुमेंटेंशन इंजिनिअरिंग या शाखेत पहिले 3 विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे असून त्यात निखिल नंदकिशोर वट्टमवार, ज्योती सुभाष भोसले, अभिलाष चंद्रकांत बुरांडे यांचा समावेश आहे. निखिल वट्टमवार याला सर्वाधिक गुण घेतल्याबद्दल आनंदरावजी देशमुख सुवर्पदक देण्यात येणार आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हील, इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रिकल या सर्व सहा शाखांमध्ये यशस्वी निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी यावर्षीही कायम राखली आहे. सलग नवव्या वर्षी निकालावर मुलींनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
तसे पाहता अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल हा शैक्षणिक क्षेत्रात नवी गगनभरारी घेणारा आहे. प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी व त्यांचे सर्व सहकारी यांनी यशस्वीरीत्या अध्यापनाचे कार्य सुरु ठेवले. या महाविद्यालयाला यशाची मोठी परंपरा असून प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जावून मिळविलेले यश हे अभूतपूर्व व संस्मरणीय आहे. शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये या महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे. महाविद्यालयातून उत्तीर्ण होवून गेलेले विद्यार्थी हे देश व परदेशात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. विद्यापीठ परीक्षेत घवघवीत यश संपादन करणार्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद आदींसह इतरांनी अभिनंदनपर कौतुक केले आहे.