शेतीच्या फेरफारासाठी एक लाखांच्या लाचेची मागणी ; अंबाजोगाईत मंडळ अधिकारी ‘एसीबी’ च्या जाळ्यात…!

टीम AM : तक्रारदाराच्या शेतीच्या फेरफाराची नोंद करून देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या एका मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. सतीश विठ्ठलराव भुसेवाड (वय 41, रा. बानाई नगर, अंबाजोगाई) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे कार्यरत होता. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या शेतीच्या फेरफार नोंदीची कार्यवाही करण्यासाठी सतीश भुसेवाड याने तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत ‘एसीबी’ च्या पथकाने तातडीने पडताळणी केली असता, भुसेवाड याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कारवाईचा संशय आल्याने अधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई बीड ‘एसीबी’ चे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लाच स्वीकारण्याची मागणी केल्याप्रकरणी सतीश भुसेवाड याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here