टीम AM : आंदोलने आणि नवरात्रोत्सवाच्या धामधुमीमुळे सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळालेल्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या मराठी चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या चित्रपटाची चर्चा सुरू असून, प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळू लागले आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि नगर येथे चित्रपटाला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. आता येत्या आठवड्यात हा चित्रपट अमेरिकेतही प्रदर्शित होणार असून, मराठी चित्रपटाची वाटचाल आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू होणार आहे.
आपल्या वेगळ्या नावामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला ‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनापूर्वी अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचीही मनोरंजनविश्वात चर्चा झाली होती.
मात्र, ‘सीजेपी’ चे आंदोलन, ‘एमपीएससी’ च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि नवरात्रोत्सवाची धामधूम यांमुळे सुरुवातीला चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाबद्दलची चर्चा वाढू लागली असून, प्रेक्षकांकडूनही त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
चित्रपटातील गाणी आणि संगीत हे त्याचे आणखी एक बलस्थान आहे. चित्रपटातील गाणी चित्रपटगृहांबाहेरही ऐकू येऊ लागल्याचे सांगितले जात आहे. अभिनेते किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे आणि क्षितीश दाते यांसारखे परिचित कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. त्यांच्यासोबत नवोदित कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.



