आमदार सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित – आमदार धनंजय मुंडे ; पदवीधर संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

टीम AM : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी पदवीधर मतदारांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातून पहिल्या पसंतीच्या मतांची मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आमदार सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित आहे, असेही आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अनिकेत मंगल कार्यालय, अंबाजोगाई येथे आज दिनांक 21 ऑक्टोबर बुधवार रोजी महायुतीच्या वतीने पदवीधर संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले‌ होते. पदवीधर संवाद मेळाव्याच्या ‌अध्यक्षस्थानी अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रमेश आडसकर, राजकिशोर मोदी, दत्ता आबा पाटील, बबन लोमटे, बालासाहेब शेप, गोविंद देशमुख, तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे, भाजपाचे राम कुलकर्णी, मकरंद पत्की, रिपाईचे महेंद्र निकाळजे, शिवसेनेचे ऋषिकेश लोमटे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी प्रथम 2010 साली विधानपरिषदेत गेलो तेव्हापासून माझा आणि सतीश भाऊंचा स्नेहबंध आहे. 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा माझ्या सोबतीला सतीश भाऊ उभे होते. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या संघर्षात ते आणि त्यांच्या संघर्षात मी कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. दुष्काळाच्या या गंभीर परिस्थितीत निवडणूका होत आहेत. पदवीधर, शिक्षक यांच्या प्रश्नांसह सिंचन ते सहकार अशा प्रत्येक क्षेत्रात सतीश चव्हाण यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे यावेळी सलग चौथ्यांदाही ते निवडून येतील, असेही आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितलं. 

यावेळी आमदार विक्रम काळे,‌ आमदार नमिता मुंदडा, रमेश आडसकर, राजकिशोर मोदी, दत्ता पाटील यांचीही भाषणं झाली. या सर्वांनी ‌आमदार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचं मत देऊन विजयी करण्याचं आवाहन केले.

कार्यक्रमाचे ‌प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ‌राजेसाहेब देशमुख यांनी केले तर अध्यक्षीय समारोप नंदकिशोर मुंदडा यांनी केला. उपस्थितांचे आभार गोविंद देशमुख यांनी मानले. या पदवीधर संवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने पदवीधर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here