टीम AM : संपूर्ण पावसाळ्यात यावर्षी पावसाने दिलेल्या तीव्र ताणामुळे बीड जिल्ह्यातील खरीप पिके अक्षरशः करपू लागली असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. पर्जन्यमानाच्या आकडेवारीचा विचार करून बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानुसार दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशीही विनंती मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, अवर्षणाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहिला नसून जिल्ह्यातील तलाव आणि विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस नियोजन करण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
दुष्काळाच्या या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनाचे विशेष नियोजन करण्यासोबतच कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याची शक्यता तपासावी, अशी मागणीही आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.



