टीम AM : महाराष्ट्रातील युवकांना एक करण्याचं काम आम्ही रिपब्लिकन सेनेमार्फत करीत आहोत. युवकांच्या समोर आता गंभीर प्रश्न उभा ठाकलेला आहे. एक तर त्यांच्या हाताला रोजगार नाही. प्रस्थापितांच्या राजकारणामुळे युवकांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी घराणेशाहीच्या राजकारणाचा उत आला आहे. त्यामुळे आम्ही युवकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्ही हा ‘युवा संवाद’ दौरा आयोजित केल्याची माहिती युवानेते अमन आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात युवानेते अमन आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अमन आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार आत्मसात करुन युवक वर्ग कुठल्याही धर्मांध राजकारणात न अडकता शिक्षण घेऊन हक्क आणि अधिकारासाठी संघर्ष करीत आहे. त्याच उदाहरण आपल्याला दिल्लीतील ‘जंतरमंतर’ वर पहायला मिळाले. परंतू, हे सर्व घडत असताना येथील सरकार युवकांना जाणूनबुजून विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवत आहे. युवकांसाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नाही. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करुन आम्ही आमदार, खासदार आणि मंत्र्यांना जाब विचारणार आहोत.
पुढे बोलताना अमन आंबेडकर म्हणाले की, देशातील शिक्षण व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली आहे. दिवसेंदिवस शिक्षण महाग होत चालले असून सर्वसामान्य मागासवर्गीय असो की इतर कोणी त्याला शिक्षण घेणे अवघड झाले आहे. सरकारी शाळा बंद करून खाजगी संस्थांना खतपाणी घालण्याचं काम सरकार करित आहे. यावर आम्ही आवाज उठविणार असल्याचे अमन आंबेडकर म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वप्न पाहिलं होतं. समाजाला शासनकर्ती जमात त्यांना बनवायचं होतं. परंतू, त्यांच्या निधनानंतर ते स्वप्न तिथचं थांबलं. अनेक लोकं आली, त्यांनी समाजाला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतू, त्यांच्या स्वार्थापोटी समाजाला कधीच एकत्रित होऊ दिले नाही, अशी खंतही अमन आंबेडकर यांनी व्यक्त केली. आज आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून एकोनसाठ जातींना एकत्रित आणण्याचं काम करीत आहेत. पण जे काही समाजकंटक आहेत, त्यांना माझं एकच सांगण आहे की, समाजापासून लांब रहा नाही तर समाज तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा…
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील शेतकरी बांधवांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ या भागात दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळाच्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अमन आंबेडकर यांनी केली. त्यासोबतचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबाजोगाईत निघणाऱ्या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेला जीवन गायकवाड, अजय गोरे, ब्रिजेश इंगळे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अमन आंबेडकर अंबाजोगाईत आले असता त्यांचं युवकांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं



