मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींची उपेक्षा कधी संपणार ? नगराध्यक्ष महोदय, विकासात समान न्याय कधी ? प्रशासनाविरोधात संताप…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेची ‘जीबी’ ची बैठक काल नगरपरिषद सभागृहात पार पडली. अत्यंत शांत वातावरणात आणि कमी कालावधीत झालेल्या या बैठकीत ब्राह्मण समाज तसेच वंजारी समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या विकासासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सूतोवाच केले. या निर्णयाचे स्वागत होत असतानाच शहरातील मागासवर्गीय बांधवांच्या स्मशानभूमींच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अंबाजोगाई शहरातील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींची अवस्था अत्यंत दयनीय असून, या प्रश्नाकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ‘अंबाजोगाई मिरर’ ने यापूर्वीही या स्मशानभूमींच्या समस्यांवर वेळोवेळी प्रकाश टाकला आहे. मात्र, अद्याप परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींचा विकास त्यांनीच करायचा का ? असा संतप्त सवाल आता मागासवर्गीय बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.

मागासवर्गीय लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष ; समाजात नाराजी

मागासवर्गीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, हा निधी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे वापरला जातो का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अनेक समस्या आजही कायम आहेत. रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत समस्यांसोबतच मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तसेच तालुका प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

काटेरी झाडं, घाणीचे साम्राज्य अन् मोडकळीस आलेले शेड

अंबाजोगाई शहरातील विविध मागासवर्गीय वस्त्यांमध्ये स्मशानभूमी उभारण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या स्मशानभूमींची अवस्था ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून, काटेरी बाभळी आणि झाडाझुडपांनी परिसर व्यापला आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीचे शेड मोडकळीस आले असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक स्मशानभूमींना संरक्षण भिंत नसल्याने जनावरांचा मुक्त वावर असतो. पेव्हर ब्लॉक, पाणी आणि विद्युत सुविधांचा अभाव असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नसतील, तर ही बाब शहराच्या विकासावर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

लालनगर – क्रांतीनगर स्मशानभूमीत अनेकदा अंधारात झाला अंत्यविधी…!

लालनगर – क्रांतीनगर परिसरातील मागासवर्गीय बांधवांसाठी लालनगर येथे स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. मात्र, या स्मशानभूमीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या भिंती पडलेल्या आहेत, परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढली आहेत, तर पाण्याची सुविधाही उपलब्ध नाही. त्यातच स्मशानभूमी परिसरातील विद्युत पुरवठा अनेकदा बंद होत असल्याने मृत व्यक्तीचा अंत्यविधी अक्षरशः अंधारात करण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे. या प्रकारामुळे अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

स्मशानभूमींची पाहणी करून तातडीने सुविधा द्या…!

नगरपरिषद प्रशासनाने शहरातील मागासवर्गीयांच्या सर्व स्मशानभूमींची प्रत्यक्ष पाहणी करावी. मोडकळीस आलेली शेड दुरुस्त करावीत, संरक्षण भिंती उभाराव्यात, परिसराची स्वच्छता करून काटेरी झाडे हटवावीत, पाणी व विद्युत पुरवठा सुरळीत करावा तसेच आवश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवावेत, अशी मागणी मागासवर्गीय जनतेतून होत आहे. याशिवाय स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यानुसार नियमितपणे स्मशानभूमींच्या सुविधांचा आढावा घेणे गरजेचे आहे. इतर समाजांच्या स्मशानभूमींच्या विकासासाठी निर्णय घेतले जात असतील तर त्याचे स्वागतच आहे; मात्र त्याचवेळी मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींनाही समान न्याय आणि समान सुविधा मिळणार कधी ? हा प्रश्न आता अंबाजोगाईकरांच्या वतीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here