टीम AM : पायात स्पोर्ट्स शूज नाहीत, अंगावर ट्रॅकसूट नाही… धावण्याचे कोणतेही विशेष प्रशिक्षण नाही. मात्र डोळ्यांसमोर दोन मुलींच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द ! याच जिद्दीच्या जोरावर रमाबाई राणवीर यांनी अंबाजोगाईतील ‘अमृत दौड’ मध्ये अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या अनोख्या विजयाची चर्चा आता केवळ अंबाजोगाईपुरती राहिलेली नसून राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रं, न्यूज चॅनल्स, पोर्टल आणि समाजमाध्यमांपर्यंत पोहोचली आहे.
रमाबाईंचा अनवाणी धावत असल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अनेकांनी त्यांचा संघर्ष पाहून कौतुक केले, पोस्ट शेअर केल्या आणि त्यांच्या जिद्दीला सलाम केला. मात्र, फक्त कौतुक करून रमाबाईंच्या आयुष्यातील परिस्थिती बदलणार आहे का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रमाबाईंची ही धाव केवळ एका स्पर्धेतील विजयाची कहाणी नाही. मुलींच्या शिक्षणासाठी परिस्थितीशी झुंज देणाऱ्या एका आईची ही आयुष्यभराची धाव आहे. पतीच्या निधनानंतर दोन मुलींची जबाबदारी रमाबाईंच्या खांद्यावर आली. परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी हिंगोली सोडून अंबाजोगाई गाठली. येथे स्वयंपाकाची कामे करून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या आपल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहेत. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलींनी शिकावे, मोठे व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, हेच त्यांचे स्वप्न आहे. आज एक मुलगी ‘बीएससी’ चे शिक्षण घेत आहे, तर दुसरी पोलिस भरतीची तयारी करत आहे. मुलींच्या भविष्यासाठी रमाबाई आजही कष्टाची शर्यत धावत आहेत.
अनवाणी पावलांमागची कहाणी वेदनादायी…
‘अमृत दौड’ च्या दिवशी पावसामुळे रस्ता चिखलमय झाला होता. अनेक स्पर्धक स्पोर्ट्स शूज आणि आधुनिक साहित्य घेऊन मैदानात उतरले होते. रमाबाईंनी मात्र साडीचा पदर सावरला, चपला हातात घेतल्या आणि अनवाणीच धावायला सुरुवात केली. एक – एक करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत त्यांनी फिनिशिंग लाईन गाठली आणि सुवर्णपदकासह 3 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. त्यांच्या पावलांना शूज नव्हते ; पण त्या पावलांमध्ये मुलींच्या भविष्याची स्वप्ने होती. हातात चपला होत्या ; पण मनात मुलींच्या शिक्षणाची मशाल होती.
कौतुकापेक्षा मदतीची गरज
आज रमाबाईंच्या जिद्दीचे कौतुक करणाऱ्या असंख्य पोस्ट समाजमाध्यमांवर दिसत आहेत. मात्र, या पोस्टसोबत एखाद्या दानशूर व्यक्तीने त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी हात पुढे केला, तर तेच रमाबाईंच्या संघर्षाला खरे बळ ठरेल.
अंबाजोगाईतील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि शिक्षणप्रेमींनी पुढाकार घेऊन रमाबाईंच्या मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रीय स्तरावर झळकलेल्या रमाबाईंच्या जिद्दीचे कौतुक तर झाले; आता त्यांच्या संघर्षाला साथ देण्याची वेळ आली आहे. फक्त कौतुक नको… त्यांच्या मुलींच्या स्वप्नांना आधार देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.



