टीम AM : अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात ‘स्वाराती’ विविध समस्यांमुळे सध्या चर्चेत आहे. प्रसूती विभागातील सोनोग्राफी मशीन चार वर्षांपासून बंद, ॲन्जोग्राफी मशीन बंद असल्याचा प्रश्न समोर आल्यानंतर आता रुग्णालयातील मंजूर पदसंख्येचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या सुमारे 50 वर्षांच्या कालखंडात वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार, विद्यार्थ्यांची संख्या आणि रुग्णभार मोठ्या प्रमाणात वाढला ; मात्र मंजूर पदसंख्येत अपेक्षित वाढ झाली नसल्याची बाब समोर येत आहे. ‘स्वाराती’ च्या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या आता 150 झाली आहे. दररोज विविध आजारांवरील उपचारांसाठी हजारो रुग्ण रुग्णालयात येत आहेत. मात्र, वाढत्या रुग्णभाराच्या तुलनेत आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व इतर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. गेल्या 50 वर्षांत वाढत्या गरजेनुसार ‘स्वाराती’ ची मंजूर पदसंख्या लोकप्रतिनिधींना वाढवता आली नाही, ही अंबाजोगाईकरांसाठी निश्चितच चिंतेची आणि दुर्दैवाची बाब आहे.
वाढता रुग्णभार, मात्र मनुष्यबळ मर्यादित
‘स्वाराती’ रुग्णालय हे अंबाजोगाईसह बीड आणि आसपासच्या जिल्ह्यांतील सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र आहे. मात्र, विविध गंभीर आजारांसाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना मोठ्या शहरांतील रुग्णालयांकडे रेफर करण्याची वेळ येत असल्याच्या तक्रारी आहेत. गंभीर आजारांचे निदान आणि उपचार वेळेत मिळणे गरजेचे असताना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांना अतिरिक्त आर्थिक खर्च आणि प्रवासाचा बोजा सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आलेली अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीही पुरेसे मनुष्यबळ किंवा तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण क्षमतेने वापरली जात नसल्याचे चित्र आहे. यंत्रसामग्री उपलब्ध असूनही तिचा अपेक्षित उपयोग रुग्णांना होत नसेल, तर कोट्यवधींचा खर्च नेमका कुणाच्या उपयोगासाठी ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…!
‘स्वाराती’ मध्ये विद्यार्थी संख्या, निवासी डॉक्टरांची संख्या आणि रुग्णभार वाढत गेला. मात्र, त्याच तुलनेत मंजूर पदांमध्ये वाढ झाली नसल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अंबाजोगाईसह आसपासच्या जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांना आधार देणाऱ्या या रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक पदनिर्मिती, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती आणि अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक वर्षांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याने अंबाजोगाईकरांमध्ये नाराजी वाढत आहे.
आता तरी कायमस्वरूपी उपाययोजना करा…!
‘स्वाराती’ च्या समस्या केवळ एखाद्या विभागापुरत्या मर्यादित न राहता त्या थेट रुग्णांच्या उपचाराशी संबंधित आहेत. त्यामुळे आवश्यक त्या सर्व विभागांमध्ये नवीन पदनिर्मिती करून तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, बंद यंत्रणा तातडीने सुरू करावी आणि अत्याधुनिक उपचार सुविधा सक्षम कराव्यात, अशी मागणी रुग्ण व नागरिकांतून होत आहे. आता तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ‘स्वाराती’ ला काळानुरूप सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे



