टीम AM : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळून त्याचा जीव वाचावा, यासाठी केंद्र सरकारने ‘राह – वीर’ योजना सुरू केली आहे. अनेकदा नागरिक पोलीस चौकशी, कोर्टाच्या फेऱ्या किंवा कायदेशीर कटकटींच्या भीतीने जखमींना मदत करणे टाळतात. नागरिकांमधील ही भीती दूर करण्यासाठी आणि त्यांना मदतीसाठी पुढे येण्यास प्रवृत्त करण्यासाठी या योजनेअंतर्गत मदत करणाऱ्या व्यक्तीला अनावश्यक चौकशी किंवा साक्षी-जबाबासाठी कोणतीही सक्ती केली जाणार नाही, अशी कायदेशीर संरक्षण देणारी महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.
अपघातानंतरचा पहिला एक तास हा गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो. या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत रुग्णालयात उपचार मिळाल्यास गंभीर जखमींचे प्राण वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणूनच, रुग्णवाहिका किंवा पोलिसांची वाट न पाहता नागरिकांनी तत्परतेने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मदतनीसाला शासनाकडून 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले जाते.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला थेट केंद्र सरकारकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अपघाताची अधिकृत नोंद ज्या पोलीस ठाण्यात झाली आहे, त्या स्थानिक पोलीस यंत्रणेकडे आपल्या मदतीची नोंद करून हा प्रस्ताव पुढे पाठवणे हा अधिकृत आणि व्यवहार्य मार्ग आहे. या योजनेमुळे समाजातील नागरिकांना निर्भयपणे रस्त्यावरील जखमींचे प्राण वाचवण्याचे मोठे बळ मिळत आहे.



