भाव कोसळले : 4 एकर टोमॅटो शेतकऱ्याने उपटला, अंबाजोगाईत शेतकरी हवालदिल…!

टीम AM : एकीकडे पावसाने दिलेली दडी आणि दुसरीकडे शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव, या दुहेरी संकटात बीड जिल्ह्यातील बळीराजा पार होरपळून निघाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील हणमंतवाडी येथील शेतकरी महादेव कराड यांच्यावर भाव नसल्यामुळे तब्बल चार एकरातील उभा टोमॅटोचा थर उपटून टाकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी महादेव कराड यांनी आपल्या चार एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. यासाठी त्यांनी तब्बल दोन लाख रुपयांचे कर्ज व भांडवल गुंतवले होते. मात्र, बाजारपेठेत टोमॅटोचे दर अचानक कोसळले. सुरुवातीला 200 रुपये प्रति कॅरेट मिळणारा भाव थेट 80 रुपयांवर खाली आला. त्यामुळे काढणी आणि वाहतुकीचा खर्चही निघणे अशक्य झाले. चार एकरांतून केवळ 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर उर्वरित टोमॅटो शेतातून उपटून टाकण्यासाठीच तब्बल 30 हजार रुपयांहून अधिक अतिरिक्त मजुरीचा फटका बसत आहे. सध्या 500 रुपये रोजंदारीने आठ महिला मजूर लावून सलग सहा दिवस टोमॅटो उपटण्याचे काम सुरू आहे.

“एकीकडे पाऊस नसल्याने सोयाबीन वाळून जात आहे, तर दुसरीकडे टोमॅटोला भाव नाही. बाजारात डाळी आणि साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत, पण शेतकऱ्याच्या मालाला मात्र कवडीमोल भाव मिळत आहे. सरकारने भाजीपाल्याला हमीभाव दिला पाहिजे. विमा आणि अनुदानाच्या केवळ घोषणा होत आहेत, प्रत्यक्षात हातात काहीच नाही,” असं आमच्या प्रतिनिधिशी बोलताना कराड यांनी सांगितलं.

रोप लागवडीसाठी 40 ते 42 हजार रुपये खर्च आला, फवारणी करण्यासाठी 50 हजार रुपये खर्च केला. त्यासोबत तोडणी बाजारात घेऊन जाण्यासाठी असा एकूण दोन लाख रुपये खर्च आला आणि माझ्या हातात 40 हजार रुपये आले. यातून हे उपटून टाकण्यासाठी महिलांना 30 हजार रुपये मजुरी दिली. सरकारने कांद्याला हमीभाव दिला तसा टोमॅटोला पण हमी भाव दिला पाहिजे अशीही प्रतिक्रिया शेतकरी महादेव कराड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here