सांची स्तूप 54 फूट, मात्र ‘हा’ स्तूप तब्बल 100 फूट! अशोककालीन इतिहासाला नवा धागा…!

टीम AM : भारतीय भूमीत जन्माला आलेल्या बौद्ध धर्माने शांतीच्या मार्गाचा अवलंब करत संपूर्ण जगाच्या इतिहासावर आपली पकड मजबूत केली. गौतम बुद्धांच्या शिकवणीतून विकसित झालेल्या बौद्ध परंपरेच्या इतिहासात स्तूपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही सम्राट अशोकनिर्मित स्तूपांची महती विशेष आहे. यात अग्रणी ठरतो तो सांचीचा बौद्ध स्तूप. सांचीच्या स्तूपाची भव्यता, शिल्पसौंदर्य, स्थापत्य पाहताक्षणीच लक्ष वेधून घेते. या अद्वितीय इतिहासात भर घालण्याऱ्या सांचीपेक्षाही मोठ्या अशोककालीन(?) स्तूपाचे उत्खनन करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे.

मध्य प्रदेश सरकारचा पुढाकार

उज्जैनमध्ये जवळपास नऊ दशकांपूर्वी झालेल्या उत्खननात ‘वैश्य टेकडी’ नामक एका विशाल टेकडीखाली मौर्यकालीन स्तूपाचे अवशेष असल्याचे संकेत मिळाले होते. याच टेकडीचे पुन्हा उत्खनन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, हा स्तूप प्रसिद्ध सांची स्तूपापेक्षाही आकाराने मोठा असण्याची शक्यता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने व्यक्त केली आहे. सम्राट अशोक, उज्जैन आणि मौर्यकालीन इतिहास यांना जोडणाऱ्या या स्थळाचे रहस्य आता नव्या शास्त्रीय उत्खननातून उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तब्बल 90 वर्षांनंतर उत्खनन

मौर्यकालीन सम्राट अशोकाशी संबंधित स्मारकांचे उत्खनन आणि पुनर्स्थापना करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने पुढाकार घेतला असून, त्याची सुरुवात उज्जैनमधील वैश्य टेकडीच्या नव्याने होणाऱ्या उत्खननापासून केली जात आहे. जवळपास 90 वर्षांच्या खंडानंतर येथे पुन्हा उत्खनन होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या स्थळाच्या उत्खनन आणि पुनर्स्थापनेच्या कामाला गती देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे स्थळ त्यांच्या उज्जैन मतदारसंघात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here