डॉ. आंबेडकर वैद्यकीय योजना : दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी केंद्र सरकारकडून 3.50 लाखांची मदत…!

टीम AM : डॉ. आंबेडकर वैद्यकीय योजनेअंतर्गत गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या गोरगरीब रुग्णांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा दिला जात आहे. डॉ. आंबेडकर फाउंडेशनमार्फत ही जीवनदायी योजना राबवली जाते. या योजनेतून पात्र रुग्णांना 3 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची थेट आर्थिक मदत मिळते. उपचारांचा खर्च थेट संबंधित रुग्णालयाच्या खात्यात वर्ग केला जातो. कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे यांसारख्या गंभीर व दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रियांचा प्रचंड खर्च सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबांच्या आर्थिक आवाक्याबाहेर असतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गरजू रुग्णांना वेळेत दर्जेदार व आधुनिक उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनमार्फत ‘डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजना’राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून पात्र रुग्णांना थेट 3 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत थेट दिली जाते.

या योजनेअंतर्गत रुग्णालयातील प्रत्यक्ष शस्त्रक्रिया व उपचारांच्या खर्चाच्या 100 टक्के रक्कम संबंधित शासकीय अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयाला थेट ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारे दिली जाते. यामध्ये किडनी किंवा अवयव प्रत्यारोपणासाठी कमाल 3 लाख 50 हजार रुपये, कर्करोगाच्या शस्त्रक्रिया व केमोथेरपीसाठी कमाल 2 लाख 50 हजार रुपये, मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी कमाल 2 लाख रुपये, तसेच हृदय आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांसाठी कमाल 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे पात्रतेचे महत्त्वाचे निकष

या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार रुग्ण हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक असून, त्याच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. याशिवाय हे उपचार केंद्र किंवा राज्य शासनाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ‘एम्स’, ‘सीजीएचएस’ मान्यताप्राप्त रुग्णालये अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये घेणे बंधनकारक असते. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रुग्णाला विहित नमुन्यातील अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र आणि संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी प्रमाणित केलेले अंदाजे उपचार खर्चाचे मूळ प्रमाणपत्र जोडून शस्त्रक्रियेच्या नियोजित तारखेच्या किमान 15 दिवस आधी हा अर्ज नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या कार्यालयाकडे सादर करावा लागतो. मंजूर झालेली रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात वर्ग होत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक आधार मिळतो. माहितीच्या अभावामुळे अनेक गरजू रुग्ण या योजनेपासून वंचित राहत असल्याने पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here