राखीच्या धाग्याने जोडले दोन बहिण – भावांचे नाते : रियाचा हात अनामतासाठी ठरला भावनिक आधार…!

टीम AM : राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मुंबईतील 15 वर्षीय अनामताने गुजरातमधील वलसाड येथे पोहोचून शिवमच्या मनगटावर राखी बांधली. मात्र, या राखीमागची कहाणी ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कारण अनामताने शिवमला राखी बांधलेला हात हा त्याची दिवंगत बहीण रिया हिचा आहे.

2022 मध्ये झालेल्या एका अपघातात अनामताच्या उजव्या हाताला विजेचा जबर धक्का बसला होता. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिचा हात वाचवता आला नाही. दरम्यान, सप्टेंबर 2024 मध्ये वलसाड येथील 9 वर्षीय रिया बॉबी मिस्त्री हिला अचानक ‘ब्रेन हॅमरेज’ झाले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला ‘ब्रेन – डेड’ घोषित केले.

रियाच्या कुटुंबीयांनी मोठा धीर दाखवत तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिचे डोळे, मूत्रपिंड, यकृत आणि उजवा हात दान करण्यात आला. रियाचा उजवा हात ‘ग्रीन कॉरिडॉर’ च्या माध्यमातून मुंबईत आणण्यात आला आणि डॉक्टरांनी तो अनामताच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपित केला. रियाच्या भावाला, शिवमला राखी बांधण्याची अनामताची इच्छा होती. त्यामुळे राखी पौर्णिमेला ती मुंबईहून वलसाडला पोहोचली आणि रियाचाच असलेल्या हाताने शिवमच्या मनगटावर राखी बांधली. तिने शिवमला घड्याळ भेट दिले. यावेळी शिवमनेही अनामताला ब्रेसलेट भेट देत, ‘माझी बहीण परत आल्यासारखे वाटले,’ अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.

अनामतानेही आपल्या भावना व्यक्त करताना, ‘हा हात आता माझा नाही, रियाचा आहे. मी दरवर्षी इथे येऊन राखी बांधणार,’ असे सांगितले. राखीच्या या धाग्याने रक्ताचे नाते नसतानाही दोन कुटुंबांना भावनिक बंधाने जोडले. अवयवदानातून मिळालेल्या एका हाताने केवळ अनामताला नवजीवन दिले नाही, तर रियाच्या भावाच्या मनगटावर पुन्हा बहिणीच्या प्रेमाचा धागाही बांधला. ही घटना माणुसकी, अवयवदान आणि नात्यांच्या अमूल्य ताकदीचा हृदयस्पर्शी संदेश देणारी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here