केज – अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात‌ : दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर…!

टीम AM : केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्याला धडकल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

केज येथून जवळबनकडे तिघे जण कारमधून जात होते. पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलाच्या कठड्यावर आदळली. धडक एवढी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि तिघेही वाहनात अडकले.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार केशव खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना बाहेर काढून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (45) आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (48), दोघे रा. जवळबन यांना मृत घोषित केले. तर दत्ता तपसे (43, रा. चंदनसावरगाव) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जवळबन गावावर शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here