टीम AM : राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि कोणकोणाचा शत्रू होईल, हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय सध्या अंबाजोगाईच्या राजकारणात पहायला मिळत आहे. नगरपरिषदेच्या निवडणूकीत एकमेकांच्या विरोधात तगडी फाईट दिलेल्या दोन आघाड्यांत ‘समझोता’ एक्सप्रेस धावली आहे. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि विद्यमान नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्यात ‘दिलजमाई’ झाली आहे, अशी खात्रीलायक माहिती आमच्या सूत्रांना मिळाली आहे. ऐरवी नगरपरिषदेच्या निवडणूकीत ऐकमेंकावर तुटून पडणारे गट आता एकाच छत्रछायेखाली राहतील. या ‘दिलजमाई’ मुळे अंबाजोगाईच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरु झाला आहे.
अंबाजोगाईचं राजकारण सध्या मोदी – मुंदडांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याच कारणही तसंच आहे. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि विद्यमान नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी संपूर्ण ह्यात राजकारणात घालवली आहे. आजही या दोन नेत्यांचा सत्ताधारी असो वा विरोधक यांच्याशी चांगले संबंध आहेत. कोणता व्यक्ती कधी ? कुठे ?, कामाला येईल याचा संपूर्ण ढाचा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हे दोन्ही घराणे अंबाजोगाईच्या राजकारणात टिकून आहेत. अंबाजोगाई नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक असो की माजी नगरसेवक आलटूनपालटून मोदी – मुंदडा कडूनच निवडून आले आहेत. परंतू, यंदाच्या नगरपरिषदेच्या निवडणूकीत दोन्ही गट सत्ता काबीज करण्यासाठी समोरासमोर आले. नगरपरिषदेची निवडणूकही त्याच ताकदीने झाली. राजकिशोर मोदी – नंदकिशोर मुंदडा या दोन नेत्यांनी निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला लावली. पण अंबाजोगाईकरांनी अजब कौल देत मोदींच्या हाती स्पष्ट बहुमत दिले तर नगराध्यक्षपद मुंदडांच्या हाती दिले. त्यामुळे गेल्या पाच सहा महिन्यांपासून नगरपरिषदेच्या राजकारणाचा चांगलाच पारा चढला होता. त्याची प्रचिती नगरपरिषदेच्या ‘जीबी’ च्या बैठकीत दिसून येत होती. परंतू, आता तो विरोध संपुष्टात आला असून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि विद्यमान नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्यात ‘दिलजमाई’ झाली असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे.
माजी आमदारांचा गट अलिप्त…!
नगरपरिषदेच्या राजकारणात राजकिशोर मोदी – नंदकिशोर मुंदडा यांच्यात ‘दिलजमाई’ झाली असली तरी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा गट अलिप्त आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गटाचे 3 नगरसेवक आहेत. त्यांनी अद्याप कुठलीही भूमिका घेतली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या गटाची भूमिका काय असेल ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विकासकामांना गती मिळेल
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या राजकारणात मोदी – मुंदडा एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे विकासकामांना ब्रेक बसला होता. परंतू, आता या दोन्ही नेत्यांत ‘दिलजमाई’ झाल्यामुळे विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा अंबाजोगाईकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अंबाजोगाईत विकासाचं राजकारण पहायला मिळेल, अशी अपेक्षा करूयात…!



