टीम AM : अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या पथकाने न्यायालयातच या आदेशाची अंमलबजावणी केली. या अनपेक्षित कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गुरुवारी नियमित न्यायालयीन कामकाजापूर्वी न्या. डॉ. रचना तेहरा यांनी आगामी लोकअदालतीच्या अनुषंगाने सर्व न्यायाधीश, भूसंपादन अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांच्या न्यायालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले. मात्र, न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच बीडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या पथकाने त्यांच्या न्यायालयात पोहोचून सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या आदेशाची अंमलबजावणी केली.
न्यायालयीन कार्यपद्धतीत सक्तीची सेवानिवृत्ती ही अत्यंत अपवादात्मक स्वरूपाची प्रशासकीय कारवाई मानली जाते. न्यायव्यवस्थेतील शुचिता आणि कार्यपद्धतीचे निकष कायम राखण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची कारवाई केली जाते. मात्र, अंबाजोगाई न्यायालयात प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच झालेल्या या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वीही अंबाजोगाईच्या जिल्हा न्यायालयात अशाच प्रकारे एका न्यायाधीशांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अंबाजोगाई न्यायालयातील या दुसऱ्या घटनेचीही न्यायालयीन वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.



