निकृष्ट दर्जाच्या कामाचा थर हाताने उखडला :  युवकांकडून रस्त्याची पोलखोल…!

केज तालुक्यातील जवळबन – सावळेश्वर – आवसगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह

टीम AM : केज तालुक्यातील जवळबन – सावळेश्वर – आवसगाव या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर स्थानिक युवकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्त्यावर करण्यात आलेला डांबरीकरणाचा थर हातानेच उखडून दाखवत युवकांनी कामाच्या गुणवत्तेची पोलखोल केली आहे. दरम्यान, याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच डांबरीकरणाचा थर सहजपणे निघत असल्याचा प्रकार समोर आल्याने संबंधित कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याचे काम टिकाऊ होत नसेल, तर या कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी युवकांकडून होत आहे.

या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची ये – जा असते. त्यामुळे रस्त्याचे काम नियमानुसार आणि दर्जेदार झाले आहे का ? याची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. हाताने डांबराचा थर उखडल्याचा व्हिडिओ समोर आल्याने संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here