‘गुलशन सर’ : खडू पकडायला हात नव्हते… तर पायालाच हात बनवले…!

टीम AM : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील बरंगा गावातील गुलशन लोहार यांची ही कहाणी. जन्मापासूनच दोन्ही हात नसतानाही त्यांनी हार मानली नाही. लहानपणी त्यांच्या आईनेच त्यांना पायाने लिहायला शिकवले, आणि हळूहळू हीच सवय त्यांची सर्वात मोठी ताकद बनली.

गुलशन लोहार यांनी शाळेपासून ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण पायाने लिहून पूर्ण केले. रोज तब्बल 74 किलोमीटरचा प्रवास करत, संघर्षांचा सामना करत ते प्रत्येक परीक्षेत टॉपर ठरले. फी भरण्यासाठी कुटुंब असमर्थ ठरलं, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या मदतीनं त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं.

आज हेच गुलशन आपल्या गावातील हायस्कूलमध्ये गणित शिकवतात. फळ्यावर पायाने लिहून ते विद्यार्थ्यांना धडे देतात आणि त्यांच्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं उदाहरण बनले आहेत. विद्यार्थी त्यांना प्रेमाने ‘गुलशन सर’ म्हणतात.

गुलशन यांच्या पत्नी अंजली प्रत्येक छोट्या – मोठ्या कामात त्यांचा आधार बनतात. दोघांचा प्रेमविवाह झाला असून, आज ते आपल्या मुलीसह साधं पण आनंदी आयुष्य जगत आहेत, कारण गुलशन मनानं खूप श्रीमंत आहेत.

महिन्याला केवळ 13 -14 हजार रुपये मानधन मिळूनही गुलशन सर समाधानी आहेत, कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठा सन्मान म्हणजे आपल्या गावातील मुलांना शिकवणं. गुलशन लोहार यांची ही कहाणी शिकवते की अडचणी कितीही मोठ्या असल्या, तरी धैर्य आणि मेहनत असेल तर प्रत्येक स्वप्न पूर्ण करता येतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here