‘स्वाराती’ रुग्णालयात सोनोग्राफी मशीन चार वर्षांपासून बंद : ‘NICU’ ऑडिटची मागणी

टीम AM : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील  ‘गायनिक’ विभागातील सोनोग्राफी मशीन मागील चार वर्षांपासून बंद असल्याने तातडीने नवीन मशीन उपलब्ध करून सेवा सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांना निवेदन देण्यात आले.

सोनोग्राफीअभावी गरोदर महिलांना बाहेर तपासणीसाठी जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच ‘NICU’ विभागाचे सुरक्षा ऑडिट करून उपकरणे, ऑक्सिजन, विद्युत व अग्निसुरक्षा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि मनुष्यबळाची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास अधिष्ठाता कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, नगरसेवक राजपाल जावळे, तानबा लांडगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here