टीम AM : संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य आणि प्रसंगावधान असेल, तर अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीवरही मात करता येते. याचाच प्रत्यय चिपळूणमध्ये आलेल्या एका थरारक घटनेत आला आहे. अवघ्या 10 वर्षांच्या स्वर्णी पवार हिने आपल्या आईला मगरीच्या तावडीतून वाचवून अतुलनीय धाडसाचं उदाहरण घालून दिलं आहे.
चिपळूण तालुक्यातील वालोपे – गणेशवाडी येथे गुरुवारी सायंकाळी ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली. नंदिनी भूपेंद्र पवार (वय 35) या आपली मुलगी स्वर्णीसोबत वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतानाच पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक नंदिनी पवार यांच्यावर झडप घातली. मगरीने त्यांच्या पायाला जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्यात ओढण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नंदिनी पवार यांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाक मारली. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत नदीकाठावरील दगड घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे मगर त्यांना पूर्णपणे खोल पाण्यात ओढून नेऊ शकली नाही. पण त्यांच्या जीवासाठी खरी लढाई अजून सुरूच होती.
आईला मगरीने पाण्यात ओढल्याचं पाहून स्वर्णी घाबरली नाही. अवघ्या 10 वर्षांच्या या चिमुकलीने क्षणाचाही विचार न करता थेट आईच्या मदतीला धाव घेतली. तिने आईचा हात घट्ट पकडला आणि आपल्या इवल्याशा हातांमध्ये असलेली सारी ताकद एकवटून तिला पाण्याबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. लेकीच्या या धाडसामुळे आणि आईने दगड घट्ट पकडून ठेवल्यामुळे नंदिनी पवार यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.
या हल्ल्यात नंदिनी पवार यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही हालचाली केल्या. या घटनेनंतर नागरिकांनी नदीत पोहण्यासाठी किंवा कपडे व जनावरे धुण्यासाठी पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्यावी, तसेच लहान मुलांना नदीकाठावर एकटे जाऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आई संकटात असल्याचं पाहून अनेक जण घाबरले असते, पण स्वर्णीने भीतीवर मात केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने आईचा हात धरला आणि तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. आई-मुलीच्या नात्यातील प्रेम आणि एका चिमुकलीचं असामान्य धाडस या घटनेतून पाहायला मिळालं. आज संपूर्ण चिपळूणमध्ये स्वर्णी पवारच्या धाडसाची चर्चा सुरू असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खरंच, वयाने लहान असली तरी संकटाच्या क्षणी तिने दाखवलेलं धैर्य खूप मोठं आहे.


