अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा पाठिंबा
टीम AM : ‘नीट’ परीक्षा पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गेल्या 19 दिवसांपासून नवी दिल्ली येथील जंतर – मंतर येथे उपोषणासाठी बसलेल्या सोनम वांगचुक यांचे उपोषण तात्काळ सोडवण्यात यावे, या मागणीसाठी आज दिनांक 17 जुलै शुक्रवार रोजी अंबाजोगाईकर एकवटले असून येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोनम वांगचुक यांच्या समर्थनात पत्रकार परमेश्वर गित्ते, शेख नईम यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी एकदिवसीय उपोषण सुरु केले आहे. दुसरीकडे त्याच ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या समर्थनात सजग अंबाजोगाईकरांनीही एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. या दोन्ही उपोषणाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून अंबाजोगाई तालुका पत्रकार संघानेही जाहीर पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष महादेव गोरे यांनी दिली आहे.
‘नीट’ परीक्षा पेपर फुटीची दखल घेऊन अभिजित दिपके यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील जंतर – मंतर वर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आल्यानंतरही त्यांनी राजीनामा न दिल्याने सोनम वांगचुक यांनी 30 जूनपासून जंतर – मंतर येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणासंदर्भात केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून धर्मेंद्र प्रधान यांना पाठिशी घालत आहे.
या सर्व घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज पत्रकार परमेश्वर गित्ते यांच्यासह सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने 17 जुलै रोजी सोनम वांगचुक यांचे उपोषण तातडीने सोडवण्यासाठी केंद्र शासनाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही एकदिवसीय उपोषणाला विविध राजकीय पक्षांचा, सामाजिक संघटनांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षणप्रेमींचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे.



