टीम AM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत ‘महा आरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाची सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये तसेच शासकीय दंत, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांनी अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या अभियानाचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती करून शिबिरे यशस्वी करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांच्या बैठकीत आज मंत्रालय येथे ‘महा आरोग्य शिबिर’ अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व होमिओपॅथी महाविद्यालयांचे अधिष्ठाता व्हीसीद्वारे उपस्थित होते.
आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन 22 ते 28 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे.
▪️शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मुंबई (जे. जे., जी. टी.), पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, बारामती, नांदेड, अकोला, जळगाव, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, गोंदिया, अंबाजोगाई, लातूर, सातारा, अलिबाग आणि नाशिक येथे 22 ते 24 जुलै या कालावधीत स्तन कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
▪️गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिर 25 ते 27 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
▪️बोन मिनरल डेन्सिटी व हाडांची तपासणी शिबिर 22 ते 24 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
▪️नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 22 ते 25 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे.
▪️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती व कोल्हापूर येथे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता तपासणी शिबिराचे आयोजन 22 जुलै तसेच 31 जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले आहे.
▪️शासकीय दंत महाविद्यालये, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल येथे 22 ते 28 जुलै या कालावधीत मुख कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.



