टीम AM : ‘नीट’ परीक्षा पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून नवी दिल्ली येथील जंतर – मंतर येथे उपोषणासाठी बसलेल्या सोनम वांगचुक यांचे उपोषण तात्काळ सोडवण्यात यावे, या मागणीसाठी सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने आज दि. 14 जुलै रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
‘नीट’ परीक्षा पेपर फुटीची दखल घेऊन अभिजित दिपके यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील जंतर – मंतर वर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आल्यानंतरही त्यांनी राजीनामा न दिल्याने सोनम वांगचुक यांनी 30 जूनपासून जंतर – मंतर येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणासंदर्भात केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून धर्मेंद्र प्रधान यांना पाठिशी घालत आहे.

या सर्व घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने आज 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सोनम वांगचुक यांचे उपोषण तातडीने सोडवण्यासाठी केंद्र शासनाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी अमर हबीब, कालिदास आपेट, कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, अमर देशमुख, सुदर्शन रापतवार, धिमंत राष्ट्रपाल, दगडू लोमटे, डॉ. कमलाकर कांबळे, कॉम्रेड अजय बुरांडे, अनिकेत लोहिया, नगरसेवक महेश लोमटे, डॉ. राजेश इंगोले, भीमराव सरवदे, राजेश वाहुळे, अशोक पालके, मदन परदेशी, अशोक हेडे, अंकुश ढोबळे यांच्यासह असंंख्य सजग अंबाजोगाईकर सहभागी झाले होते.



