वीट मारून महिलेचा खून : नातेवाईकांचे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चनई वडरवस्ती येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 50 वर्षीय यशोदा बालाजी राठोड यांचा डोक्यात वीट मारून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अंबाजोगाई शहर पोलिसांनी सुभाष लष्करे याला अटक केली आहे. या प्रकरणात सुभाष लष्करे, मंदाकिनी लष्करे, विश्व लष्करे आणि ईंद्र लष्करे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राणी राठोड यांच्या तक्रारीनुसार, मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी यशोदा राठोड या गेल्या असता त्यांच्यावर वीट फेकून मारण्यात आली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या रोहन आडे व फिर्यादी राणी राठोड यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यशोदा राठोड यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी बुधवारी सकाळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब फड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here